Home Uncategorized विद्यापीठांनी नवोन्मेष, कौशल्य विकास आणि रोजगार निर्मितीला प्राधान्य द्यावे -राज्यपाल जिष्णु देव वर्मा

विद्यापीठांनी नवोन्मेष, कौशल्य विकास आणि रोजगार निर्मितीला प्राधान्य द्यावे -राज्यपाल जिष्णु देव वर्मा

39 second read
0
0
6

no images were found

विद्यापीठांनी नवोन्मेष, कौशल्य विकास आणि रोजगार निर्मितीला प्राधान्य द्यावे -राज्यपाल जिष्णु देव वर्मा

 

  • विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकीय दृष्टिकोन विकसित करण्यावर भर द्यावा
  • विकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग करावा

 कोल्हापूर, : विद्यापीठांनी विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल साक्षरता, विश्लेषणात्मक विचारक्षमता, सर्जनशीलता, प्रभावी संवादकौशल्य आणि उद्योजकीय दृष्टिकोन विकसित करण्यावर भर द्यावा. तसेच भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नवोन्मेष, कौशल्य विकास आणि रोजगार निर्मितीला प्राधान्य द्यावे. तर विकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी विद्यार्थ्यांनी आपले ज्ञान, कौशल्यांचा उपयोग करावा, असे आवाहन राज्यपाल तथा कुलपती जिष्णु देव वर्मा यांनी केले.

      शिवाजी विद्यापीठाचा 63 वा दीक्षांत समारंभ राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली व भारताचे माजी लष्कर प्रमुख तथा मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटचे मानद कर्नल आणि अरुणाचल प्रदेशचे माजी राज्यपाल जनरल जे.जे. सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत राजमाता जिजाऊ सभागृहात पार पडला, यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. राजनीश कामत, राज्यपाल यांचे सचिव प्रशांत नारनवरे, प्र. कुलगुरु डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखा अधिकारी सुहासिनी पाटील तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

       राज्यपाल जिष्णू देव वर्मा म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य व त्यांचे विचार आजही आपल्याला प्रेरणा देत असून त्यांच्या नावाने उभारलेल्या शिवाजी विद्यापीठाची वाटचाल प्रगतीच्या दिशेने होत आहे. या विद्यापीठाने सहा दशकांहून अधिक काळ कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील गावे, शहरे आणि तालुक्यांपर्यंत उच्च शिक्षणाचा प्रकाश पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. या प्रदेशाच्या विकासात विद्यापीठाची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.

       पदवी ही केवळ एका विद्यार्थ्याचा शैक्षणिक गौरव नसून समाजात घडत असलेल्या परिवर्तनाचे महत्त्वपूर्ण प्रतीक असते. उच्च शिक्षणातील महिलांचा वाढता सहभाग ही सर्वसमावेशक विकासाचे सकारात्मक प्रतिबिंब आहे. मात्र, उच्च शिक्षणातील तरुणांचे घटते प्रमाण गांभीर्याने विचार करण्याजोगे आहे. सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वंचित घटकांमधील विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणातील सहभाग वाढवण्यासाठी एकूण पटनोंदणी वाढवण्यास प्राधान्य द्यावे. आर्थिक, भौगोलिक, सामाजिक अडथळ्यांमुळे गुणवंत तरुणाला उच्च शिक्षणापासून वंचित रहावे लागू नये, यासाठी ‘स्कूल कनेक्ट’ सारख्या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी.

      राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र परिवर्तन घडत असनू या धोरणातील बाबींचे प्रतिबिंब विद्यापीठांचे प्रत्यक्ष शैक्षणिक वातावरण आणि कार्यपद्धतीत दिसून यावे. तसेच विद्यापीठांमध्ये होणाऱ्या संशोधनांमध्ये वैज्ञानिक उत्कृष्टतेइतकेच मानवी मूल्यांना महत्त्व द्यावे.उच्च शिक्षण, संशोधन, नवोन्मेष आणि पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून भरीव सहकार्य मिळत आहे. विद्यापीठांनी या संधींचा पुरेपूर लाभ घेवून उद्योगक्षेत्र, संशोधन संस्था, स्थानिक समुदाय तसेच जगभरातील विद्यापीठांशी सहकार्याचे नवे पूल निर्माण करावेत.

      सध्या तंत्रज्ञानात अभूतपूर्व परिवर्तन होत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, स्वयंचलन, क्वांटम तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान यामुळे उद्योगविश्व, रोजगाराच्या संधी आणि संपूर्ण समाजव्यवस्थेचे स्वरुप बदलत आहे. पदवीधर विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षमतांचे आकलन करण्याबरोबरच यातील मर्यादा आणि परिणामांची जाणीव ठेवावी.

       उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढवण्यासाठी आणि भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यापीठांना सज्ज करण्याच्या दृष्टिने राजभवनात ‘फ्युचरिस्टिक टेक्नॉलॉजी फोरम’ सुरु करण्यात आला आहे. या फोरमचे नेतृत्व प्रा. डॉ. राजनीश कामत करत असल्याचे सांगून त्यांच्या कामाचे त्यांनी कौतुक केले.

      कोल्हापूर जिल्ह्यात औद्योगिक आणि आर्थिक विकासाची प्रचंड क्षमता आहे. या प्रदेशातील औद्योगिक आणि आर्थिक परिसंस्था अधिक बळकट करण्यासाठी शिवाजी विद्यापीठाने योगदान द्यावे. उद्योगक्षेत्रातील भक्कम भागीदारीमुळे नवोन्मेषाला चालना देण्यासाठी उत्पादकता वाढवण्यासाठी आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्यासाठी विद्यापीठातील शैक्षणिक तज्ज्ञता आणि संशोधन क्षमतेचा उपयोग सहकारी संस्था, फौंड्री, अभियांत्रिकी, वस्त्रोद्योग तसेच जगप्रसिद्ध कोल्हापुरी चपलेशी संबंधित पारंपरिक कारागिरांच्या विकासासाठी व्हावा.

    युवा पदवीधरांनी बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता विकसित करावी. आपल्या ज्ञानात सातत्याने भर घालावी आणि तंत्रज्ञानातील आव्हानांचे संधीत रुपांतर करावे.  विकसित भारताचे स्वप्न साकार करताना विद्यार्थ्यांनी या राष्ट्रीय परिवर्तनाचे केवळ साक्षीदार न राहता त्याचे सक्रिय शिल्पकार व्हावे. आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजसेवेसाठी, वंचितांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी आणि राष्ट्राच्या बळकटीसाठी करावा. संवेदनशील आणि जबाबदार नागरिक व्हावे. विकसित, सर्वसमावेशक आणि प्रगतशील भारताच्या निर्मितीत महत्त्वपूर्ण योगदान द्यावे, असे आवाहन पदवीधर विद्यार्थ्यांना राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.

विकसित भारत घडवण्यासाठी युवकांनी योगदान द्यावे    – भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल जे.जे. सिंग

 भारताचे माजी लष्करप्रमुख तथा मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटचे मानद कर्नल आणि अरुणाचल प्रदेशचे माजी राज्यपाल जनरल जे.जे. सिंग म्हणाले, सध्याच्या युवा पिढीमध्ये गुणवत्ता आणि  प्रचंड क्षमता आहे. जगाच्या कानाकोपऱ्यातील ज्ञान आणि माहिती ते क्षणार्धात मिळवू शकतात. जगात सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी भारत आहे. विकसित भारत घडविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर असून यासाठी युवकांनी योगदान द्यावे.

      भारताला संशोधन आणि नवोन्मेषाचे जागतिक केंद्र बनवण्याच्या दिशेने वाटचाल सुरु असताना पेटंट्स, संशोधनपर प्रकाशने आणि नवनवीन शोध अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. संशोधक विद्यार्थ्यांनी त्यांचे संशोधन केवळ शैक्षणिक नियतकालिकांपुरते मर्यादित राहू न देता ते प्रत्यक्ष जीवनातील समस्या सोडविण्यासाठी आणि सामान्य माणसांचे जीवन अधिक सुखकर करण्यासाठी उपयोगात आणावे.

    भारतीय विद्यापीठांमध्ये आणि विशेषतः शिवाजी विद्यापीठात विविध क्षेत्रांत मुली उल्लेखनीय यश मिळवत आहेत. “तुमच्या महत्त्वाकांक्षांना समाजाला मर्यादा घालू देऊ नका. प्रत्येक निर्णयप्रक्रियेत आपले स्थान आत्मविश्वासाने निर्माण करा. एकमेकींना सहकार्य करा आणि धाडसाने नेतृत्व करा,”असे आवाहन करुन ते म्हणाले,  छत्रपती शिवाजी महाराज व महापुरुषांच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जीवनात वाटचाल करा. यशस्वी होण्यासाठी कोणताही शॉर्टकट अवलंबू नका. तत्त्वांशी तडजोड करु नका.  विद्यापीठाचा नावलौकिक वाढवा. विद्यापीठाला तुमचा अभिमान वाटेल, असे कर्तृत्व गाजवा.  आपले ज्ञान समाजाच्या कल्याणासाठी आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी उपयोगी पडेल असे कार्य करा, असे आवाहन त्यांनी केले. 

   शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. राजनीश कामत यांनी प्रास्ताविकातून विद्यापीठाच्या शैक्षणिक आणि सर्वांगीण वाटचालीबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, महापुरुषांच्या समृद्ध विचारांचा वारसा शिवाजी विद्यापीठाला लाभला असून अनेक मान्यवरांच्या परिश्रमातून हे विद्यापीठ उभारले आहे. विद्यापीठाचे कार्यक्षेत्र कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांत विस्तारले असून या अंतर्गत 287 संलग्नित महाविद्यालये आहेत. विद्यापीठात 34 अधिविभाग, 2 स्कूल्स, 19 अभ्यास व संशोधन केंद्रे आणि 15 अध्यासने आहेत. दीक्षांत सोहळ्यात 60 हजार 250 स्नातकांना पदवी प्रमाणपत्र देण्यात येत असून यामध्ये 34 हजार 670 विद्यार्थिनी (57.55 टक्के)  आहेत.

    महाराष्ट्र -कर्नाटक सीमा भागातील विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ विशेष सवलत योजना राबवत असून विद्यार्थी सुविधा केंद्रात एक खिडकी योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना कमी कालावधीत अधिक सुलभपणे आवश्यक कागदपत्र उपलब्ध होत आहेत. डिजिटल परिवर्तन, पारदर्शक परीक्षा प्रक्रिया, वेळेत निकाल, आर्थिक बचत आणि विद्यार्थी केंद्र सेवा या माध्यमातून शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन विभागाने प्रशासकीय कार्यक्षमतेचा नवा आदर्श निर्माण केला आहे. आपली कौशल्ये, आत्मविश्वास आणि सृजनशीलतेच्या बळावर शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळा ठसा उमटवीत आहेत, असे सांगून कोणतेही काम करताना विद्यार्थ्यांनी निष्ठा, प्रामाणिकपणा आणि नैतिकतेशी कधीही तडजोड करु नका. आपले ज्ञान आणि कौशल्य केवळ वैयक्तिक प्रगतीपुरते मर्यादित न ठेवता ते समाजाच्या आणि राष्ट्राच्या उन्नतीसाठी समर्पित करा, असे आवाहन त्यांनी केले.

    या सोहळ्यात स्नातकांना कुलपती व मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. सन २०२५-२०२६ या शैक्षणिक वर्षात क्रीडा, बौद्धिक, कला क्षेत्र, एन.सी.सी., एन.एस.एस. मध्ये गुणवत्ता तसेच सर्वसाधारण कौशल्यासाठीचे राष्ट्रपती सुवर्णपदक तनुजा बाजीराव साळुंखे (एम.बी.ए. अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) या विद्यार्थिनीस बहाल करण्यात आले.

     एम.ए. (भाषा व सामाजिक शास्त्रे) अभ्यासक्रमामधून ‘मानसशास्त्र’ या विषयात सर्वाधिक गुण मिळाल्याबद्दल कुलपती सुवर्णपदक वेदिका उमेश कदम (कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, इस्लामपूर) या विद्यार्थिनीस तर  पीएच.डी. पदवीधारक स्नातकातून सामाजिक कार्यात असाधारण योगदान दिलेल्या व्यक्तीस विशेष सन्मान श्रेणी डॉ. दीपक सावंत यांना देण्यात आले.

   आभार कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी मानले. या सोहळ्याला  विविध क्षेत्रातील मान्यवर, सर्व विद्याशाखांचे अधिष्ठाता, अधिसभा सदस्य, स्नातक, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

पुष्पा इम्पॉसिबलमध्ये शनायाला मिळवण्याच्या प्रयत्नात चिरागबद्दलच्या टायगरच्या मत्सरामुळे समोर येणार त्याची काळी बाजू

पुष्पा इम्पॉसिबलमध्ये शनायाला मिळवण्याच्या प्रयत्नात चिरागबद्दलच्या टायगरच्या मत्सरामुळे स…