no images were found
स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३२७ जणांवर महापालिकेची कारवाई : नोव्हेंबर महिन्यात ५ लाख ७३ हजार ७५० रुपयांचा दंड वसूल
कोल्हापूर, : शहरातील स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य अबाधित राखण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकामार्फत स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणारे नागरिक व व्यावसायिक यांच्याविरोधात दंडात्मक कारवाई सुरू आहे. या मोहिमेंतर्गत १ ते २५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत विविध नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३२७ जणांवर कारवाई करून ५ लाख ७३ हजार ७५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
महापालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भारूड यांच्या आदेशानुसार व उपायुक्त परितोष कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य व घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. सिंगल युज प्लास्टिकचा वापर, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, थुंकणे, उघड्यावर लघुशंका करणे, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे तसेच रस्त्यावर खरमाती टाकणे अशा प्रकारांवर पथकाकडून कारवाई करण्यात येत आहे.
या कारवाईमध्ये सिंगल युज प्लास्टिकचा वापर करणाऱ्या १०८ नागरिक व व्यावसायिकांकडून १ लाख ६० हजार ९५० रुपये, उघड्यावर कचरा टाकणाऱ्या १५५ नागरिकांकडून ३ लाख ५० हजार ५०० रुपये, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान, लघुशंका व थुंकणाऱ्या १२ व्यक्तींकडून ५ हजार ९०० रुपये, तर अतिक्रमण करणाऱ्या व रस्त्यावर खरमाती टाकणाऱ्या ४८ व्यक्तींकडून ५२ हजार ९०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
शहरातील सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखणे, अस्वच्छतेमुळे निर्माण होणारे उपद्रव रोखणे आणि नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जबाबदारीची जाणीव निर्माण करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. यासाठी महापालिकेच्या आरोग्य व घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत नियमितपणे तपासणी व कारवाई करण्यात येत आहे.
महानगरपालिकेने नागरिकांना दैनंदिन कचरा केवळ महापालिकेच्या अधिकृत घंटागाडीकडेच द्यावा, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, उघड्यावर कचरा जाळू नये, रस्त्यावर अथवा नाल्यांमध्ये कचरा टाकू नये तसेच प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर टाळावा असे आवाहन केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात संबंधित कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून आवश्यकतेनुसार गुन्हेही दाखल करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.