no images were found
रंगांधत्वाच्या वैद्यकीय नोंदी, मेडिकल बोर्डाच्या अहवालात विसंगती?
प्रशासकीय अधिकारी मानसिंग जगताप यांच्या फिटनेस /दिव्यांग प्रमाणपत्राची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी
कोल्हापूर(प्रतिनिधी) : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर येथे कार्यरत प्रशासकीय अधिकारी मानसिंग जगताप यांच्या वैद्यकीय पात्रता,
रंगांधत्वासंबंधी वैद्यकीय नोंदी आणि त्यांना प्राप्त झालेल्या फिटनेस/दिव्यांग प्रमाणपत्राबाबत गंभीर संशय निर्माण झाला आहे. या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष व उच्चस्तरीय वैद्यकीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते धनाजी पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
मानसिंग जगताप यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रशासकीय अधिकारी पदावर नियुक्ती स्वीकारली आहे. उपलब्ध माहितीनुसार, त्यांच्या वैद्यकीय तपासणीच्या प्रक्रियेत रंगांधत्वाबाबत नोंद/आक्षेप निर्माण झालेला असल्याचे दिसून येते. कोल्हापूर येथील वैद्यकीय मंडळाच्या तपासणी संदर्भातही त्यांच्या वैद्यकीय पात्रतेबावत प्रश्न उपस्थित झाले होते.या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे, माहितीच्या अधिकारातून प्राप्त कागदपत्रांमध्ये जगताप यांनी स्वतःला रंगांधत्व असल्याचे मान्य केले असल्याची माहिती आमच्याकडे उपलब्ध आहे. त्यानंतर त्यांच्या वैद्यकीय पात्रतेबाबत पुणे येथील ससून रुग्णालयातील बोर्ड ऑफ रेफरी/वैद्यकीय तपासणीची प्रक्रिया झाल्याचे समोर येत आहे.
या संदर्भात ससून रुग्णालयाकडे माहितीच्या अधिकारांतर्गत संबंधित वैद्यकीय तपासणी, बोर्ड ऑफ रेफरीचा अहवाल, फिटनेस प्रमाणपत्र तसेच संबंधित वैद्यकीय कागदपत्रांची माहिती मागण्यात आली होती. प्रारंभी जनमाहिती अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास नकार दिला. त्यानंतर करण्यात आलेल्या अपीलमध्ये अपिलीय अधिकारी डॉ. यल्लाप्पा जाधव यांनी मागितलेली माहिती देण्याचे निर्देश दिले.
मात्र, त्यानंतरही संबंधित नेत्रविकार तज्ज्ञांकडून सदर दस्तऐवज उपलब्ध करून देता येत नसल्याचे पत्र देण्यात आले आहे. त्यामुळे माहिती देण्यास नकार दिला आहे. म्हणजे अपिलीय अधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी का झाली नाही? संबंधित वैद्यकीय नोंदी उपलब्ध करून देताना निश्चित अनियमितता झाली आहे त्यामुळे लपवाछपवी सुरु आहे. मानसिंग जगताप यांना फिटनेस प्रमाणपत्र कोणत्या वैद्यकीय निकषांच्या आधारे देण्यात आले आहे हे समाजासमोर येणे गरजेचे आहे.
या सर्व बाबींच्या पार्श्वभूमीवर मानसिंग जगताप यांनी नियमबाह्य पद्धतीने फिटनेस /दिव्यांग प्रमाणपत्र मिळविले आहे, याची स्वतंत्र वैद्यकीय व प्रशासकीय चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे.
या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी यापूर्वी मा. अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे यांच्याकडे करण्यात आली होती. मात्र, आमच्या तक्रारीवर अपेक्षित ती कार्यवाही झाल्याचे दिसून आलेले नाही. तसेच या विषयासंदर्भात भेट घेण्यासाठी गेल्यानंतरही अधिष्ठात्यांनी भेट देणे टाळले आहे.
मानसिंग जगताप यांच्या रंगांधत्वाची स्वतंत्र व निष्पक्ष वैद्यकीय तपासणी तात्काळ करण्यात यावी. कोल्हापूर मेडिकल बोर्ड, ससून रुग्णालयातील बोर्ड ऑफ रेफरी आणि त्यानंतर देण्यात आलेल्या फिटनेस /दिव्यांग प्रमाणपत्राची संपूर्ण वैद्यकीय फाईल व नोंदी तपासण्यात याव्यात. संबंधित सर्व वैद्यकीय अहवाल, बोर्डाच्या कार्यवाहीची नोंद, नेत्रतज्ज्ञांचे मत, चाचणी अहवाल व फिटनेस प्रमाणपत्र यांची स्वतंत्र तज्ज्ञ समितीमार्फत पडताळणी करण्यात यावी.
चौकशी पूर्ण होईपर्यंत, प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन मानसिंग जगताप यांना प्रशासकीय पदावरून निलंबीत करण्याबाबत शासनाने निर्णय घ्यावा, जेणेकरून चौकशीवर कोणताही प्रभाव पडणार नाही.