no images were found
पुणे,: मुंढवा येथील सुमारे ४० एकर शासकीय जमिनीच्या कथित गैरव्यवहार, बेकायदेशीर हस्तांतरण आणि कमी बाजारमूल्यातील व्यवहाराची निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केली आहे. राज्यसभेचे खासदार पार्थ पवार यांच्या भूमिकेचीही स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी आवश्यक असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले.
यासंदर्भात पाटील यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल करून संबंधित जमीन व्यवहारातील सर्व व्यक्ती, कंपनीचे पदाधिकारी, अधिकारी तसेच संभाव्य लाभार्थी यांची भूमिका तपासण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात न्यायालयाने उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर तपास कोणत्याही राजकीय अथवा प्रशासकीय दबावापासून मुक्त असणे आवश्यक असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.
जमिनीशी संबंधित महसूल अभिलेख, रेडी रेकनरनुसार मूल्य, प्रत्यक्ष व्यवहारातील रक्कम, विक्रीखत, पॉवर ऑफ ॲटर्नी, विविध परवानग्या तसेच अमेडिया इंटरप्राइसेज कंपनीचे ROC/MCA रेकॉर्ड तपासण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. त्याचबरोबर संबंधित बँक खात्यांमधील आर्थिक व्यवहार आणि पैशांचा प्रवाह तपासून या व्यवहारातून कोणाला प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष आर्थिक लाभ झाला, हे स्पष्ट करावे, असे त्यांनी नमूद केले.
संगनमत, फसवणूक, विश्वासघात, पदाचा गैरवापर, बनावट कागदपत्रे किंवा शासकीय मालमत्तेचे नुकसान झाले आहे का, हे तपासावे. तपास केवळ विद्यमान आरोपींपुरता मर्यादित न ठेवता सर्व संबंधित व्यक्ती व संभाव्य लाभार्थींची भूमिका तपासावी, असे पाटील यांनी नमूद केले आहे. कोणत्याही राजकीय, सामाजिक किंवा प्रशासकीय प्रभावामुळे अनुचित लाभ मिळाला नाही ना, याची खातरजमा करावी. गुन्हा दाखल असल्यास पुढील तपास करून आवश्यकतेनुसार पूरक आरोपपत्र दाखल करीत कार्यवाही करण्याची मागणी पाटील यांनी केली आहे.
राज्यसभेचे खासदार पार्थ पवार यांच्या भूमिकेचीही स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे. तपासात कोणत्याही व्यक्तीचा सहभाग आढळल्यास, त्यांची ओळख किंवा राजकीय प्रभाव न पाहता कायद्यानुसार कारवाई करावी. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले असल्यास संबंधित अधिकारी व इतर दोषींवर फौजदारी तसेच भ्रष्टाचारविरोधी कायद्यांतर्गत कठोर कारवाई करावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.