Oplus_131072
no images were found
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची विशेष ट्री कटिंग उठाव मोहीम
मिरवणूक व विसर्जन मार्गावरील ट्री कटिंग साहित्य उचलण्यासाठी ६ जेसीबी व १२ डंपर सज्ज
कोल्हापूर, : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मिरवणूक व विसर्जन मार्ग स्वच्छ, सुरक्षित व अडथळामुक्त ठेवण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने रविवार, दि. १३ सप्टेंबर २०२६ रोजी विशेष ट्री कटिंग उठाव मोहीम राबविण्यात येणार आहे. आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या सूचनेनुसार या मोहिमेचे नियोजन करण्यात आले आहे.
गणेशोत्सवाच्या मिरवणुका व विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर विविध मार्गांवर करण्यात आलेले ट्री कटिंग तसेच महावितरण मार्फत छाटण्यात आलेल्या झाडांच्या फांद्या रस्त्यावर पडून राहू नये, यासाठी महापालिकेने विशेष मोहीम हाती घेतली आहे.
या मोहिमेसाठी दोन स्वतंत्र पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. पथक क्र. १ मार्फत विभागीय कार्यालय क्र. १ व २ अंतर्गत ट्री कटिंग साहित्याचा उठाव करण्यात येणार असून, या पथकाचे प्रमुख मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पोवार असतील. पथक क्र. २ मार्फत विभागीय कार्यालय क्र. ३ व ४ अंतर्गत कार्यवाही करण्यात येणार असून, या पथकाचे प्रमुख सहायक आयुक्त डॉ. विजय पाटील असतील.
विशेष मोहिमेसाठी ६ जेसीबी व १२ डंपर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या यंत्रसामग्रीच्या सहाय्याने मिरवणूक व विसर्जन मार्ग तसेच शहरातील काही भागात रस्तेकडेला पडून असलेले ट्री कटिंग साहित्य तातडीने उचलून मार्ग मोकळे करण्यात येणार आहेत.
सदर मोहिमेमध्ये अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ व उपआयुक्त पारितोष कंकाळ हे देखील सहभागी होणार असून, संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून ही कार्यवाही करण्यात येणार आहे.
गणेशोत्सवाच्या कालावधीत नागरिकांना मिरवणूक व विसर्जन मार्गावर कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये, तसेच वाहतूक व सुरक्षिततेच्या दृष्टीने मार्ग सुकर राहावेत, यासाठी महापालिकेने ही विशेष मोहीम हाती घेतली आहे.