no images were found
मेरठचं नाव नथूराम गोडसे नगर करणार; हिंदू महासभेची घोषणा
मेरठ : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या कऱणाऱ्या नथूराम गोडसे याचं नाव मेरठला दिली जाईल अशी घोषणा हिंदू महासभेने केली आहे. मेरठमध्ये लवकरच महापालिका निवडणुका पार पडणार आहेत. याच पार्श्वभूमीवर हिंदू महासभेने ही घोषणा केली आहे.
हिंदू महासभेने निवडणुकीसाठीचा आपला जाहीरनामा मंगळवारी सादर केला आहे. या जाहीरनाम्यात मेरठ नगरपालिकेची निवडणूक जिंकलो तर पहिल्यांदा मेरठचं नाव बदलून नथूराम गोडसे नगर ठेवु अशी घोषणा हिंदू महासभेकडुन करण्यात आली आहे. दरम्यान हिंदू महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पंडित अशोक शर्मा आणि प्रवक्ते अभिषेक अग्रवाल यांनी सांगितले की, हिंदू महासभा मेरठ नगरपालिका निवडणूक लढवणार आहे. महापौर, आमदार, नगरसेवक सर्वच ठिकाणी हिंदू महासभेचे उमेदवार उभे राहणार आहेत. मेरठमध्ये हिंदू महासभा विजयी झाली तर जिल्ह्याचे नाव नथूराम गोडसे नगर करु. त्याचबरोबर शहरातील ठिकाणांची नावे बदलून हिंदू महापुरुषांच्या नावे लावु, अशी घोषणा या नेत्याने केली आहे.
मेरठमधील हिंदू महासभेच्या कार्यालयात महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथूराम गोडसे यांचे मंदिर बांधले आहे. या ठिकाणी नारायण आपटे यांचीही मूर्ती आहे. उत्तर प्रदेशमध्ये मेरठ येथे हिंदू महासभेने वादग्रस्त स्वरूपाची घोषणा केलीय त्यामुळे वातावरण चिघळण्याची शक्यता आहे.