Home संशोधन मोत्यांच्या शेतीसाठीच्या अभिनव टाकीच्या डिझाईनला पेटंटशिवाजी विद्यापीठाचे शेतकऱ्यांसाठी वरदायी संशोधन

मोत्यांच्या शेतीसाठीच्या अभिनव टाकीच्या डिझाईनला पेटंटशिवाजी विद्यापीठाचे शेतकऱ्यांसाठी वरदायी संशोधन

4 second read
0
0
6

no images were found

मोत्यांच्या शेतीसाठीच्या अभिनव टाकीच्या डिझाईनला पेटंटशिवाजी विद्यापीठाचे शेतकऱ्यांसाठी वरदायी संशोधन

कोल्हापूर,(प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागाने विकसित केलेल्या ‘गोड्या पाण्यातील मोती शेतीसाठीच्या टाकीच्या डिझाईन’ला नुकतेच भारत सरकारचे पेटंट प्राप्त झाले आहे. ‘प्रयोगशाळेपासून शेतीपर्यंत’ या प्रकारचे संशोधन करणाऱ्या शिवाजी विद्यापीठाच्या प्राणीशास्त्रज्ञांना हे यश मिळाले आहे.

विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र अधिविभागातील डॉ. नितीन कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करणाऱ्या साक्षी श्रीकांत ढेकणे, विशाल संभाजी सुतार आणि दिलीप आनंदराव कांबळे यांच्या संशोधनकार्याचे हे फलित आहे.

भारतामध्ये गोड्या पाण्यातील मोती शेतीला मोठी संधी उपलब्ध असून, त्यासाठी आवश्यक असलेले नियंत्रित आणि नैसर्गिक वातावरण निर्माण करणे हे मोठे आव्हान मानले जाते. शिवाजी विद्यापीठाने दोन वर्षांपूर्वी प्राणीशास्त्र अधिविभागात गोड्या पाण्यातील मोत्यांच्या शेतीचा प्रकल्प हाती घेऊन तो प्रमाणाबाहेर यशस्वी करून दाखविला आहे. आता या प्रकल्पाअंतर्गत विविध बाबींचा सूक्ष्म अभ्यास करून हा प्रयोग अधिकाधिक यशस्वी करण्याच्या दृष्टीने संशोधनाची दिशा केंद्रित केली आहे. याचाच भाग म्हणून या संशोधकांनी मोत्यांच्या शेतीसाठी आवश्यक अशा वैज्ञानिक निकषांनुसार दोन परस्पर जोडलेल्या टाक्यांची अभिनव रचना विकसित केली आहे.

टाकीची रचना व महत्त्व

या टाकीच्या डिझाईनमध्ये दोन वेगवेगळ्या आकारांच्या परस्पर जोडलेल्या टाक्यांचा समावेश आहे. पहिल्या टाकीतील सबमर्सिबल पंपाद्वारे पाणी दुसऱ्या टाकीत सतत प्रवाहित केले जाते. दुसऱ्या टाकीत विशेष पाईपलाइन आणि स्प्रिंकलर प्रणाली बसविण्यात आली असून त्यामुळे पाण्यात नैसर्गिक नदीप्रवाहासारख्या लहरी निर्माण होतात. छतावरील स्प्रिंकलर्समधून नियंत्रित वेगाने होणारा पाण्याचा शिडकावा कृत्रिम पावसासारखे वातावरण तयार करतो. या अखंड जलपरिभ्रमणामुळे पाण्यातील विरघळलेल्या प्राणवायूचे प्रमाण, तापमान, पीएच आणि एकूण पाण्याची गुणवत्ता दीर्घकाळ संतुलित राहते. परिणामी मोती उत्पादनासाठी वापरण्यात येणाऱ्या शिंपल्यांना नैसर्गिक अधिवासासारखे पोषक वातावरण उपलब्ध होते. या अभिनव टाकीच्या माध्यमातून एकदाच भरलेले पाणी १५ ते १८ महिन्यांपर्यंत गुणवत्तेत कोणताही लक्षणीय बदल न होता वापरणे शक्य झाल्याचे या संशोधनातून सिद्ध झाले आहे. ही रचना केवळ मोती शेतीसाठीच नव्हे, तर संशोधन, शिक्षण, जैवविविधता संवर्धन आणि कृषीपूरक उद्योगांसाठीही उपयुक्त ठरणार आहे.

प्राणीशास्त्र अधिविभागात विकसित झालेल्या या तंत्रज्ञानामुळे भविष्यात शेतकरी, संशोधक तसेच लघु व मोठ्या उद्योजकांना मोती उत्पादनाचा पर्यायी व्यवसाय विकसित करण्यासाठी मोठी मदत होणार आहे. यासाठी अधिविभागाची संशोधक विद्यार्थिनी साक्षी ढेकणे हिने भुवनेश्वर (ओडिशा) येथील आयसीएआर-सीआयएफए (सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर फ्रेशवॉटर एक्वाकल्चर) येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षणही घेतले आहे.

‘कृषीपूरक उद्योग म्हणून विकासाची क्षमता’

या संदर्भात डॉ. नितीन कांबळे यांनी सांगितले की, या पेटंटमुळे शिवाजी विद्यापीठाच्या संशोधनाधारित तंत्रज्ञान विकसित करण्याच्या क्षमतेची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली आहे. हे संशोधन भविष्यात तंत्रज्ञान हस्तांतरण (Technology Transfer) आणि व्यावसायिकीकरणासाठीही महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पारंपरिक शेतीला पूरक व्यवसाय म्हणून गोड्या पाण्यातील मोती शेतीकडे शेतकरी वळू शकतात. कमी देखभाल खर्च, कमी वीज वापर आणि नियंत्रित जलव्यवस्थापनामुळे हे तंत्रज्ञान ग्रामीण भागात रोजगार व उत्पन्नवाढीसाठी उपयुक्त ठरण्याची क्षमता आहे.

‘लॅब टू लँड’ संकल्पनेला मूर्त रुप देणारे संशोधन: कुलगुरू डॉ. कामत

या संदर्भात संशोधकांचे अभिनंदन करताना कुलगुरू डॉ. राजनीश कामत म्हणाले की, शिवाजी विद्यापीठात समाजोपयोगी आणि उद्योगाभिमुख संशोधनाला सातत्याने प्रोत्साहन दिले जात आहे. या पेटंटमुळे संशोधनाचे रूपांतर प्रत्यक्ष तंत्रज्ञानात करण्याच्या आमच्या प्रयत्नांना बळ मिळाले असून, शेतकरी व उद्योजकांसाठी नवीन संधी उपलब्ध होतील. संशोधन, नवोपक्रम आणि समाजोपयोगी तंत्रज्ञान विकासाच्या दिशेने शिवाजी विद्यापीठाने टाकलेले हे आणखी एक महत्त्वाचे पाऊल असून, ‘प्रयोगशाळेतील संशोधन ते शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत’ या संकल्पनेला मूर्त रूप देणारे हे पेटंट आहे.

 

गोड्या पाण्यातील मोती शेतीसाठीच्या टाकीची वैशिष्ट्ये-

* दोन परस्पर जोडलेल्या वैज्ञानिक पद्धतीने डिझाइन केलेल्या टाक्या

* सतत पाणी परिभ्रमण, कृत्रिम लहरी आणि पावसासारखा शिडकावा

* पाण्यातील विरघळलेल्या प्राणवायूचे प्रमाण वाढविणारी रचना

* तापमान, पीएच व पाण्याची गुणवत्ता दीर्घकाळ स्थिर ठेवण्याची क्षमता

* नैसर्गिक नदीसदृश परिसंस्था निर्माण करणारे डिझाईन

* कमी वीज वापर आणि कमी देखभाल खर्च

* सर्व ऋतूंमध्ये वापरण्यास सुलभ रचना

* संशोधन, शिक्षण व व्यावसायिक मोती शेतीसाठी उपयुक्त तंत्रज्ञान.

 

या संशोधनाचे फायदे-

* मोती उत्पादनासाठी वापरण्यात येणाऱ्या शिंपल्यांचे आरोग्य सुधारते.

* मृत्यूदरात लक्षणीय घट होते.

* उत्पादनक्षमता वाढण्यास मदत होते.

* पाण्याची गुणवत्ता दीर्घकाळ टिकून राहते.

* अमोनियाचे प्रमाण नियंत्रित राहते.

* नैसर्गिक परिसंस्थेचे संवर्धन होते.

* रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते.

* शेतकरी, संशोधक आणि उद्योजकांसाठी किफायतशीर तंत्रज्ञान.

* कृषीपूरक व्यवसाय म्हणून मोती शेतीला चालना मिळणार.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In संशोधन
Comments are closed.

Check Also

“पालकांसाठी हा शो मुलांना देऊ शकणाऱ्या सर्वात मोठ्या देणगीची आठवण करून देतो, ती म्हणजे योग्य मूल्यं आणि अढळ चारित्र्य”:मनीष वाधवा

“पालकांसाठी हा शो मुलांना देऊ शकणाऱ्या सर्वात मोठ्या देणगीची आठवण करून देतो, ती म्हणजे योग…