Home संशोधन सामाजिक शास्त्रांमध्येही उपयुक्त संशोधन होणे आवश्यक: डॉ. जॅस्मिन

सामाजिक शास्त्रांमध्येही उपयुक्त संशोधन होणे आवश्यक: डॉ. जॅस्मिन

1 second read
0
0
9

no images were found

सामाजिक शास्त्रांमध्येही उपयुक्त संशोधन होणे आवश्यक: डॉ. जॅस्मिन

कोल्हापूर,: विज्ञान क्षेत्रांमधील संशोधनाइतकेच सामाजिक शास्त्रांमधील संशोधनही उपयुक्त असून त्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी समाजाभिमुख संशोधन करण्यावर भर द्यावा, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅस्मिन यांनी व्यक्त केले. ग्रामीण विकासामध्ये जिल्हा परिषद अत्यंत मूलभूत व महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र अधिविभागाद्वारे काल ‘जिल्हा परिषदेच्या अभ्यासाची चौकट’ या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. त्यावेळी प्रमुख साधन व्यक्ती म्हणून मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.

डॉ. जॅस्मिन म्हणाल्या, बदलत्या काळात सामाजिक शास्त्रे मागे पडताना दिसत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी केवळ पदवीपुरते संशोधन न करता आपल्या संशोधनाचा समाजाला प्रत्यक्ष कसा उपयोग होईल, याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. संशोधनासाठी विषयाची निवड करताना सध्याची सामाजिक गरज काय आहे, हे ओळखूनच विषयांची निवड करावी, जेणेकरून या संशोधनातून समाजाला योग्य दिशा मिळेल.

यावेळी त्यांनी जिल्हा परिषदेची प्रशासकीय रचना, तिचे प्रत्यक्ष कामकाज आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने तळागाळातील घटकांसाठी राबवले जाणारे विविध उपक्रम व विकास योजना यावर सविस्तर मांडणी केली.

‘संशोधनक्षम विद्यार्थ्यांकडून आत्मनिर्भर भारताकडे’

तत्पूर्वी, कार्यशाळेचे उद्घाटन विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या हस्ते झाले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे मुख्य उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये जीवनोपयोगी कौशल्ये विकसित करून त्यांची रोजगारक्षमता वाढवणे हे आहे. या धोरणात संशोधनालाही रोजगाराचे महत्त्वपूर्ण क्षेत्र म्हणून स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची संशोधन क्षमता वाढवणे आणि त्यांच्यात संशोधन कौशल्ये विकसित करणे ही आजची गरज आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. सामाजिक समस्या सोडवण्यासाठी विज्ञान आणि सामाजिक शास्त्रे यांनी संयुक्त संशोधन करणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत त्यांनी मांडले.

‘गाथा ग्रामविकासाची’मधून उलगडला अभ्यासपूर्ण प्रवास

कार्यशाळेमध्ये ज्येष्ठ पत्रकार समीर देशपांडे यांनी ‘गाथा ग्रामविकासाची- कोल्हापूर जिल्हा परिषद: अनुभव आणि आठवणी’ या विषयावर उपस्थितांशी सविस्तर संवाद साधला. ग्रामविकासाच्या अनेक चांगल्या आणि नाविन्यपूर्ण संकल्पना कागदावर अतिशय उत्तमरित्या उतरतात, परंतु त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी मात्र तितक्याच ताकदीने आणि प्रभावीपणे होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यांनी गेल्या काही दशकांत बदलत गेलेल्या राजकारणाच्या आणि निवडणुकांच्या स्वरूपावर प्रकाश टाकला. ग्रामीण भागाचा कणा असलेल्या या मराठी शाळांच्या अडचणी सोडवून त्या टिकवणे आणि मजबूत करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. यावेळी प्राचार्य डॉ. दिनकर पाटील अध्यक्षस्थानी होते.

कार्यशाळेला मानव्यविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, डॉ. भारती पाटील, डॉ. शार्दुल सेलुकर, डॉ. संजय सपकाळ, डॉ. नेहा वाडेकर, डॉ. दत्तात्रय सावंत यांच्यासह विविध महाविद्यालयांतील प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी व अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यशाळा समन्वयक डॉ. सुखदेव उंदरे यांनी स्वागत केले. राज्यशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. प्रकाश पवार यांनी प्रास्ताविक केले. आयेशा अत्तार यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. दत्तात्रय सावंत यांनी परिचय करून दिला, तर डॉ. नेहा वाडेकर यांनी आभार मानले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In संशोधन
Comments are closed.

Check Also

भागीरथी महिला संस्था आणि वस्त्रम् गारमेंटचा आदर्शवत उपक्रम

शिलाई व्यवसायाचे मोफत प्रशिक्षण आणि मशिन मिळालेल्या महिलांनी उत्तम व्यवसाय करत आत्मनिर्भरत…