no images were found
कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या कारभाराची चौकशी करा; मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या कार्यपद्धतीबाबत आमदार राजेश क्षीरसागर यांचे मुख्य सचिवांना पत्र
कोल्हापूर : कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विक्रांत गायकवाड यांच्या कार्यपद्धतीबाबत गंभीर तक्रारी व आक्षेप प्राप्त होत असून, त्यांच्या कार्यकाळातील कामकाजाची सखोल चौकशी करून दोष आढळल्यास योग्य प्रशासकीय व विभागीय कारवाई करावी, अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव तसेच नगरविकास विभागाच्या अपर मुख्य सचिवांकडे निवेदन दिले आहे.
प्राधिकरणाच्या माध्यमातून शहर हद्दवाढ, विकासकामे, अनधिकृत बांधकामांवरील नियंत्रण, पायाभूत सुविधा तसेच नागरिकांशी संबंधित विविध महत्त्वाचे विषय हाताळले जात असताना लोकप्रतिनिधींशी आवश्यक समन्वय राखला जात नसल्याचा आक्षेप क्षीरसागर यांनी घेतला आहे. गायकवाड यांनी पदभार स्वीकारल्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींना प्राधिकरणाच्या आढावा बैठकीस निमंत्रित केले नसल्याचे तसेच विकासकामे व प्रशासकीय निर्णयांचा सविस्तर आढावा अहवालही सादर करण्यात आलेला नसल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर शहर हद्दवाढीबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली असतानाही प्रस्तावित हद्दवाढीतील गावांमध्ये जनजागृती, नागरिकांशी संवाद, ग्रामस्तरावरील बैठका आणि मूलभूत सुविधांच्या नियोजनाबाबत प्रभावी कार्यवाही झालेली दिसत नसल्याचा मुद्दाही क्षीरसागर यांनी उपस्थित केला आहे.
रस्ते, पायाभूत सुविधा, अनधिकृत बांधकामे तसेच नागरिकांच्या तक्रारींवर अपेक्षित कार्यवाही होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे प्राधिकरणाच्या कार्यपद्धतीबाबत नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
गायकवाड यांच्या कार्यकाळातील निर्णयप्रक्रिया, लोकप्रतिनिधींशी समन्वय, शहर हद्दवाढीची प्रगती, नागरिकांच्या तक्रारींवरील कार्यवाही आणि अनधिकृत बांधकामांबाबतची भूमिका यांची सखोल चौकशी करून, चौकशीत दोष अथवा निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी आमदार क्षीरसागर यांनी केली आहे.