no images were found
गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये सोन्याचे महत्त्व वाढले; गोल्ड ईटीएफकडे गुंतवणूकदारांचा कल
कोल्हापूर : भारतात सोने हे परंपरा आणि समृद्धीचे प्रतीक मानले जात असले, तरी आता गुंतवणुकीच्या दृष्टीनेही त्याचे महत्त्व वाढत आहे. महागाईपासून संरक्षण, आर्थिक अनिश्चिततेत स्थिरता आणि गुंतवणुकीचे विविधीकरण यासाठी सोने महत्त्वाचा पर्याय ठरत आहे.
वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या आकडेवारीनुसार, २०२५ मध्ये सोन्याने जागतिक स्तरावर ६७.४१ टक्के परतावा दिला. तसेच मागील २० वर्षांत सोन्याने सुमारे ११.२९ टक्के वार्षिक चक्रवाढ परतावा नोंदवला आहे. मात्र, मागील कामगिरी भविष्यातही कायम राहील याची खात्री नसते.
तज्ज्ञांच्या मते, इक्विटी, डेट आणि सोने अशा विविध मालमत्ता वर्गांमध्ये गुंतवणूक केल्यास पोर्टफोलिओचे विविधीकरण साधण्यास मदत होते. महागाई, भू-राजकीय तणाव आणि जागतिक आर्थिक अनिश्चिततेच्या काळात सोन्याची भूमिका महत्त्वाची ठरते.
बदलत्या काळानुसार प्रत्यक्ष सोने खरेदी करण्याऐवजी गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) आणि गोल्ड फंड ऑफ फंड्स यांसारख्या डिजिटल गुंतवणूक पर्यायांकडे गुंतवणूकदारांचा कल वाढत आहे. तसेच इक्विटी, डेट आणि सोने अशा विविध मालमत्ता वर्गांमध्ये गुंतवणूक करणारे मल्टी-अॅसेट आणि हायब्रिड फंडही पर्याय म्हणून उपलब्ध आहेत.
दीर्घकालीन आर्थिक नियोजन करताना गुंतवणूकदारांनी आपली आर्थिक उद्दिष्टे, गुंतवणुकीचा कालावधी आणि जोखीम क्षमता लक्षात घेऊन सोन्यातील गुंतवणुकीचे प्रमाण निश्चित करावे, असे आवाहन एसबीआय म्युच्युअल फंडच्या गुंतवणूकदार शिक्षण व जागरूकता उपक्रमातून करण्यात आले आहे.