no images were found
बोगस मतदारांना चाप लावताना प्रामाणिक मतदारांचे नाव कटू देऊ नका: हेमंत पाटील
अनेक मतदारसंघांमध्ये एकाच मतदाराची नावे दोन किंवा अधिक ठिकाणी असल्याचे समोर येते. काही संशयास्पद मतदारसंघांमध्ये २ ते ४ टक्क्यांपर्यंत दुबार किंवा बोगस नावे असण्याची शक्यता असते. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अशी बोगस आणि दुबार नावे शोधून ती तात्काळ वगळली पाहिजेत. बऱ्याचदा नाव किंवा पत्ता दुरुस्तीच्या नावाखाली प्रशासकीय हलगर्जीपणामुळे अनेक वर्षांपासून मतदान करणाऱ्या वैध मतदारांची नावे यादीतून गायब होतात. असे झाल्यास नागरिकांच्या मूलभूत हक्कावर गदा येईल. त्यामुळे नावांची अचूक खातरजमा करणे अनिवार्य आहे.
गेल्या काही निवडणुकांचा ट्रेंड पाहिला तर तांत्रिक चुकांमुळे किंवा स्थलांतराचा चुकीचा अंदाज लावल्यामुळे जवळपास १ ते १.५ टक्के खऱ्या आणि वैध मतदारांची नावे अनपेक्षितपणे वगळली गेल्याच्या तक्रारी आल्या असल्याचे पाटील म्हणाले. बूथ लेव्हल ऑफिसर्स (बीएलओ) हे या प्रक्रियेचा मुख्य कणा आहेत. त्यांनी केवळ कार्यालयात बसून कागदोपत्री काम न करता, प्रत्यक्ष जागेवर जाऊन प्रामाणिकपणे आणि निष्पक्षपातीपणे पडताळणी करावी. कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता त्यांनी आपले कर्तव्य चोख बजावावे,असे आवाहन पाटील यांनी केले.
बनावट मतदार ही आपल्या लोकशाहीला लागलेली मोठी कीड आहे. ही कीड समूळ नष्ट करण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक या सर्वच राजकीय पक्षांनी मतभेद बाजूला ठेवून एकत्र काम केले पाहिजे. जागृत नागरिक आणि सजग राजकीय प्रतिनिधीच एक पारदर्शक मतदार यादी तयार करू शकतात, जी निकोप लोकशाहीसाठी अत्यंत आवश्यक आहे, असे पाटील म्हणाले.