no images were found
ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपा–शिवसेना महायुतीचा विजय: रविंद्र चव्हाण- एकनाथ शिंदे यांच्या राजकीय चाणक्यनीतीचा करिष्मा
ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीपाठोपाठ आता अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकीय चाणक्यनीतीचा करिष्मा दिसून आला आहे.
वास्तविक ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यकारिणीच्या निवडणुकीत सहकार पॅनल विरुद्ध परिवर्तन पॅनल अशी लढत झाली असली, तरीही बहुजन विकास आघाडीचे बँकेवर वर्षानुवर्षे असणारे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांनी भाजपा आणि शिवसेना या दोन्हीही पक्षांचे उमेदवार दोन्ही पॅनलमध्ये उभे केले होते. या निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीचे दोन्ही पॅनलमध्ये मिळून १४ उमेदवार निवडून आल्याने अध्यक्षपदावर कोणाचा उमेदवार निवडून येतो हे पाहणे रंजक ठरले होते.
या रंजक राजकीय अंकानंतर झालेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीचे १४ तर बहुजन विकास आघाडीचे ७ उमेदवार यांनी मतदान केले. विशेष म्हणजे निवडणुकीतील पॅनलच्या माध्यमातून एकमेकांसमोर उभे ठाकलेले भाजपचे किसन कथोरे आणि कपिल पाटील या दोघांची अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मात्र एकजूट दिसून आली, हा रवींद्र चव्हाण यांच्या राजकीय प्रगल्भतेचा परिणाम असल्याचे सांगितले जात आहे. मात्र त्याचवेळी शिवसेनेचे एक मत फुटल्याने एकनाथ शिंदे यांना हादरा बसला आहे.
थोडक्यात, या राजकीय नाट्यानंतर आता ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपद भाजपा-शिवसेना महायुतीकडे गेले आहे. अखेर बँकेच्या अध्यक्षपदी अरुण बाळू पाटील यांची तसेच उपाध्यक्ष पदी भाग्यश्री निलेश भोईर यांची निवड झाली आहे. बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व उलथवण्यात रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे या जोडीला यश आलं आहे.