no images were found
राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त जन्मस्थळी विविध मान्यवरांकडून अभिवादन
पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून पुष्पहार अर्पण
कोल्हापूर, : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मस्थळ असलेल्या लक्ष्मी विलास पॅलेस येथे विविध मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. समाजसुधारक, लोककल्याणकारी राजा आणि सामाजिक समतेचे पुरस्कर्ते म्हणून शाहू महाराजांचे कार्य आजही समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे यावेळी व्यक्त करण्यात आले.
यावेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार अमल महाडिक, महापौर रूपाराणी निकम, विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, शिवाजी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, शाहू जन्मस्थळ जतन विकास समितीचे इंद्रजीत सावंत, वसंतराव मुळीक यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी समाजातील वंचित, शोषित आणि दुर्बल घटकांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी केलेले कार्य, सर्वांसाठी शिक्षणाची दारे खुली करण्याचा दूरदर्शी निर्णय, सामाजिक न्यायासाठी आरक्षणाची मुहूर्तमेढ रोवणे तसेच जातीभेद निर्मूलनासाठी घेतलेले धाडसी निर्णय यांचे यावेळी स्मरण करण्यात आले. त्यांच्या विचारांवर आणि आदर्शांवर चालण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.
कार्यक्रमास विविध विभागांचे शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी, शिक्षक तसेच शाहूप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर शाहू जन्मस्थळ जतन विकास समितीच्या वतीने पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना शाहू जन्मस्थळ संग्रहालयासाठी जमीन हस्तांतरण तसेच कोल्हापूर इतिहास संग्रहालयासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबतचे निवेदन सादर करण्यात आले.