no images were found
मुंबई-पुणे प्रवासातील ‘मिसिंग लिंक’ म्हणजे आधुनिक अभियांत्रिकीचा आविष्कार: मिसिंग लिंक नव्हे तर कनेक्टिंग लिंक..! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
रायगड-अलिबाग, :- “मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ हा केवळ एक रस्ता नसून भारतीय अभियांत्रिकी कौशल्याचा जागतिक स्तरावरील अजोड नमुना आहे. या प्रकल्पामुळे केवळ प्रवासाचा वेळच वाचणार नाही, तर तो राज्याच्या अर्थव्यवस्थेला 70 हजार कोटींची गती देणारा ‘इकॉनॉमिक मल्टिप्लायर’ ठरेल,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
या प्रकल्पास मिसिंग लिंक पेक्षा ‘कनेक्टिंग लिंक’ संबोधणे जास्त संयुक्तिक असल्याचे सांगून या प्रकल्पाच्या लोकार्पणानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाच्या तांत्रिक आणि सुरक्षिततेच्या पैलूंवर विशेष प्रकाश टाकला.
या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, रोजगार हमी मंत्री भरत गोगावले, राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, खासदार सुनील तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर-पाटणकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परीक्षेत्र डॉ.संजय दराडे, जिल्हाधिकारी किशन जावळे, एमएसआरडीसीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलीस अधीक्षक आंचल दलाल, सहव्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील, एमएसआरडीसीचे इतर अधिकारी तसेच या प्रकल्पांतर्गत बोगद्याच्या बांधकामातील सहभागी नवयुगा कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
प्रकल्पाबाबत माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या प्रकल्पात प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून तांत्रिकदृष्ट्या हा मार्ग अत्यंत प्रगत आहे. यामध्ये अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणा, वॉटर मिस्ट सिस्टीम आणि दर 50 मीटरवर आपत्कालीन दूरध्वनीची सोय करण्यात आली आहे. सुरक्षेचा विशेष उपाय म्हणून दर 300 मीटरवर दोन्ही बोगद्यांना जोडणारे ‘कनेक्टर्स’ तयार करण्यात आले आहेत, जेणेकरून एखाद्या बोगद्यात दुर्घटना घडल्यास दुसऱ्या बोगद्यातून प्रवाशांचे सुरक्षित स्थलांतर करता येईल. संपूर्ण मार्गावर 24 तास सीसीटीव्हीची देखरेख असून, लेनची शिस्त पाळली जावी, यासाठी ‘इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ कार्यान्वित करण्यात आली आहे. नियम मोडणाऱ्या वाहनधारकांना आता थेट ई-चलान पाठवले जाईल, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.
अतिशय कठीण भौगोलिक परिस्थितीत, दऱ्याखोऱ्यांत आणि जंगलांमध्ये यंत्रसामुग्री नेऊन हे काम पूर्ण करणे मोठे आव्हान होते, असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी या कामात योगदान देणाऱ्या सात देशांतील तज्ज्ञ संस्थांचे आणि कंपन्यांचे आभार मानले.
कोविडच्या काळात आलेल्या अडचणींवर मात करत महायुती सरकारने या कामाला गती दिली आणि आज 7 हजार 181 कोटी रुपयांचा हा प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण झाला आहे. या प्रकल्पामुळे खोपोली ते कुसगाव दरम्यानचे अंतर 6 किलोमीटरने कमी होणार असून प्रवाशांचा किमान 25 ते 30 मिनिटांचा वेळ वाचणार आहे.
विशेष म्हणजे हा प्रकल्प ज्या उंबरखिंडीच्या परिसरात साकारला आहे, तिथेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी मुघलांचा पराभव केला होता, या ऐतिहासिक संदर्भाची आठवणही मुख्यमंत्र्यांनी करून दिली.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या मुंबई पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडी संदर्भातील व्हिडिओचा संदर्भ देत त्यांची व नागरिकांची दिलगिरी व्यक्त केली. “सुप्रिया ताई, तुम्ही आज शेवटच्यांदा वाहतूक कोंडीत अडकलात, आता ‘मिसिंग लिंक’ सुरू झाल्यामुळे यापुढे तुम्हाला किंवा इतर कोणत्याही प्रवाशांना घाटात ट्रॅफिकमध्ये अडकण्याची वेळ येणार नाही,” असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. तसेच कामगार दिनाचे औचित्य साधत त्यांनी या प्रकल्पासाठी घाम गाळणाऱ्या सर्व कामगारांचे आणि एमएसआरडीसीच्या चमूचे कौतुक केले. या ‘कनेक्टिंग लिंक’मुळे मुंबई-पुणे हा नॉलेज आणि टेक्नॉलॉजी कॉरिडॉर अधिक सक्षम होऊन राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी उभारी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाच्या यशामध्ये सर्व स्तरावरील योगदानाचा आवर्जून उल्लेख केला. हा प्रकल्प म्हणजे केवळ एका व्यक्तीचे यश नसून, ज्या-ज्या हातांनी यात हातभार लावला त्या सर्वांचे त्यांनी मनापासून अभिनंदन केले.विशेषतः कोविडच्या काळात जेव्हा अनेक आव्हाने समोर होती, तेव्हा एमएसआरडीसी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी बॅकलॉग भरून काढत हे काम पूर्ण केल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. एकेकाळी हा प्रकल्प रद्द करण्याचा किंवा न होण्याचा विचार सुरू होता, परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते आव्हान स्वीकारून अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले आणि कामाला सुरुवात केली. श्री.शिंदे यांनी आठवण करून दिली की, प्रकल्पाच्या भूमिपूजनावेळी ते स्वतः एमएसआरडीसी मंत्री होते आणि आज लोकार्पणाच्या वेळीही हे खाते त्यांच्याकडेच आहे, हा एक दुर्मिळ योगायोग आहे.