Home मनोरंजन पाच वर्षांनंतर प्राजक्ता गायकवाडचं मालिका विश्वात दमदार पुनरागमन; तर गौरी इंगवलेची मालिका विश्वात दमदार एण्ट्री

पाच वर्षांनंतर प्राजक्ता गायकवाडचं मालिका विश्वात दमदार पुनरागमन; तर गौरी इंगवलेची मालिका विश्वात दमदार एण्ट्री

9 second read
0
0
8

no images were found

पाच वर्षांनंतर प्राजक्ता गायकवाडचं मालिका विश्वात दमदार पुनरागमन; तर गौरी इंगवलेची मालिका विश्वात दमदार एण्ट्री

स्टार प्रवाहवर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे नवी मालिका ‘पाठराखीण’. ही गोष्ट आहे प्रत्येक संकटात आणि प्रत्येक वेदनेत एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं रहाणाऱ्या भाग्यश्री आणि प्राजक्ता या दोन बहिणींची. बहिणींच्या नात्यातील निस्सीम प्रेम, त्याग आणि जिव्हाळा या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. सुख-दुःखात नेहमी सोबत असणाऱ्या या बहिणींचं आयुष्य मात्र एका अनपेक्षित वळणावर बदलतं. परिस्थिती, समाज आणि नियती यांच्या कसोटीवर त्यांचं नातं कसं टिकून रहातं, याची उत्कंठावर्धक मांडणी या मालिकेतून पाहायला मिळणार आहे. स्टार प्रवाहवर लवकरच सुरू होत असलेल्या या मालिकेच्या निमित्ताने सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड तब्बल ५ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. तर अनेक सिनेमांच्या माध्यमातून आपल्या अभिनयाची छाप पाडलेली गुणी अभिनेत्री गौरी इंगवले पाठराखीणच्या निमित्ताने मालिका विश्वात दमदार एण्ट्री घेणार आहे.

      पुन्हा एकदा मालिका विश्वात पुनरागमन करताना नेमकी काय भावना आहे हे सांगताना प्राजक्ता म्हणाली, पुन्हा प्रेक्षकांना भेटण्यासाठी मी प्रचंड उत्सुक आहे. खूप दिवसांपासून मालिका कधी करणार यासाठी विचारणा होत होती. पाठराखीण मालिकेच्या निमित्ताने ही सुवर्णसंधी चालून आली. स्टार प्रवाह सारखी लोकप्रिय वाहिनी आणि बांदेकर कुटुंबियांची सोहम प्रोडक्शन सारखी निर्मिती संस्था असताना नाही म्हणण्याचं कारणच नव्हतं. मध्यंतरीच्या काळात बरेच मराठी आणि दाक्षिणात्य चित्रपट केले. अनेक जाहिराती केल्या. टीव्ही हे माझं अत्यंत आवडतं माध्यम आहे. आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा वेगळी भूमिका आहे. प्राजक्ता कुलकर्णी असं माझ्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. लहान वयातच आई-वडिलांचं छत्र गमावलेल्या प्राजक्ताचा सांभाळ तिचे मामा चंद्रशेखर वैद्य यांनी केला. तिच्यासाठी मामा-मामी म्हणजे जणू विठ्ठल-रखुमाई. त्यांचा प्रत्येक शब्द तिच्यासाठी अंतिम आहे. वैद्य कुटुंबावर तिचं अपार प्रेम आहे आणि या घराचं भलं व्हावं यासाठी ती काहीही करु शकते. प्रेक्षकांनी या भूमिकेलाही प्रेम द्यावं ही अपेक्षा आहे असं प्राजक्ता म्हणाली.

     अभिनेत्री गौरी इंगवले देखिल मालिका विश्वात एण्ट्री घेण्यासाठी खूप उत्सुक आहे. खूप दिवसांपासून मालिका करण्याची इच्छा होती. पाठराखीण मालिकेमुळे माझी इछापूर्ती होतेय असं म्हण्टलं तर वावगं ठरणार नाही. टीव्ही माध्यमात काम करण्याचा अनुभव खूप वेगळा आहे. या जगाशी नव्याने ओळख करुन घेतेय. मालिकेच्या माध्यमातून तुम्ही घराघरात पोहोचता. त्यामुळे खूप उत्सुक आहे. माझ्या कुटुंबियांनी देखिल खूप प्रोत्साहन दिलं. त्यामुळेच मी मालिका करण्याचा निर्णय घेतला. मला खात्री आहे ही मालिका आणि या मालिकेतील सगळी पात्रं प्रेक्षकांना नक्की आवडतील.

       सोहम आदेश बांदेकर यांच्या सोहम प्रोडक्शनने या मालिकेची निर्मिती केली आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शक राहुल लिंगायत या मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत. या मालिकेतून अनेक दिग्गज कलाकार भेटीला येणार आहेत. तेव्हा पाहायला विसरु नका नवी मालिका पाठराखीण लवकरच फक्त स्टार प्रवाहवर.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन
Comments are closed.

Check Also

अदाणी पॉवर ने Q4 FY26 मध्ये मजबूत कामगिरी नोंदवली; नफ्यात 64% वाढ

अदाणी पॉवर ने Q4 FY26 मध्ये मजबूत कामगिरी नोंदवली; नफ्यात 64% वाढ अहमदाबाद, : अदाणी समूहाच…