no images were found
झेंडा मराठीचा… मराठी भाषेचा… मराठी कर्तृत्वाचा’:
‘विश्वमंगल मराठी फाउंडेशन’चा भव्य शुभारंभ महाराष्ट्र दिनी १ मे रोजी आळंदी येथे,:
माजी मंत्री, आमदार सुभाष देशमुख यांच्या संकल्पनेतील मराठी भाषिकांसाठीचे जागतिक व्यासपीठ
मराठी भाषा, संस्कृती, परंपरा यांचा प्रचार-प्रसार आणि जागतिक स्तरावर मराठी समाजाचे एकत्रीकरण साधणे या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या ‘विश्वमंगल मराठी फाउंडेशन’ या नव्या जागतिक व्यासपीठाचा भव्य शुभारंभ महाराष्ट्र दिनी शुक्रवारी १ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता ऐतिहासिक आळंदी येथे होत आहे. संत श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या कृपासानिध्यात फाउंडेशनच्या संकल्पनेचे प्रणेते आणि लोकमंगल उद्योग समूहाचे संस्थापक आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या नेतृत्वात फ्रुटवाले धर्मशाळा, आळंदी येथे हा सोहळा पार पडणार आहे.
मराठी भाषा, संस्कृती आणि उद्योजकतेला जागतिक व्यासपीठ मिळवून देण्याच्या दृष्टीने आमदार सुभाष बापू देशमुख (सोलापूर) यांनी हा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला असून ते संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. वस्त्रोद्योग मंत्री म्हणून आ. सुभाष देशमुख यांनी केलेले कार्य वाखाणण्याजोगे होते आणि त्यातून उद्योगाला एक उभारी मिळाली. आ. देशमुख यांच्या कल्पक प्रयत्नातून हे नवे, जागतिक व्यासपीठ आकाराला आले असून महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीच्या ६६ व्या वर्धापनदिनी त्याचा शुभारंभ होत आहे.
या शुभारंभ कार्यक्रमासाठी ज्येष्ठ निरूपणकार व प्रख्यात वक्ते मा. श्री. विवेकजी घळसासी हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर विविध क्षेत्रातील मान्यवर, नामांकित उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ यांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभणार आहे.
‘झेंडा मराठीचा… मराठी भाषेचा… मराठी कर्तृत्वाचा’ हे फाउंडेशनचे घोषवाक्य असून, मराठी भाषा व मराठी समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे फाउंडेशनने ठाम वचन आहे. संत श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या जन्माला ७५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, ज्ञानेश्वरीतील अध्यात्मिक शिकवण आणि ‘पसायदान’मधील विश्वकल्याणाचा संदेश जगभर पोहोचविणे हे फाउंडेशनचे प्रमुख ध्येय आहे. यासोबतच मराठी भाषा, संस्कृती व परंपरेचा जागतिक स्तरावर प्रचार-प्रसार करणे, तसेच महाराष्ट्रातील मराठी शाळांचे पुनरुज्जीवन करून भाषा व संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करणे, हे महत्त्वपूर्ण उद्दिष्ट संस्थेने डोळ्यांसमोर ठेवले आहे.
जागतिकीकरणाच्या रेट्यात जगभर विखुरलेल्या मराठी समाजाला एका व्यासपीठावर आणून संवाद, सहकार्य आणि ज्ञानविनिमयाची संधी उपलब्ध करून देणे, हे संस्थेचे उद्दिष्ट आहे. शिक्षण, उद्योग, उद्योजकता आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत मराठी व्यक्तींना एकत्र आणून महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला चालना देणे, या दिशेनेही फाउंडेशन पावले टाकणार आहे.
फाउंडेशनची रचना जागतिक स्तरावर समन्वय साधण्यासाठी करण्यात आली असून, जागतिक शिखर कार्यकारी समितीतीत १० सदस्य असतील, तर देशपातळीवरील कार्यकारी समित्या या प्रत्येकी ५ सदस्यांच्या असतील. महाराष्ट्रातील ६ विभागांसाठी विभागीय समित्या या प्रत्येकी १० सदस्यांच्या असणार आहेत.
या शुभारंभ सोहळ्याच्या निमित्ताने नामांकित उद्योजकांच्या उपस्थितीत उद्योजकीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. नवउद्योजकांना जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, उद्योग उभारणीसाठी आवश्यक मार्गदर्शन, नेटवर्किंग आणि समन्वय निर्माण करणे हा या परिसंवादाचा मुख्य उद्देश आहे. या परिसंवादात डॉ. संजय वायाळ (उद्योग सल्लागार), मा. अप्पासाहेब कोंढारे (दुबई), मा. उदय भोसले (लंडन) आदी मान्यवर सहभागी होणार आहेत.
फाउंडेशन डिजिटल माध्यमातून जागतिक संपर्क व समन्वय प्रस्थापित करणार असून, नियमित परिषद, चर्चासत्रे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच देश-विदेशातील महाराष्ट्र मंडळे आणि विविध संस्थांशी सहकार्य वाढवून पारदर्शक व सहभागात्मक कार्यप्रणाली राबवली जाणार आहे.
मराठी अस्मितेच्या बळकटीकरणासाठी आणि मराठी समाजाच्या जागतिक उन्नतीसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या शुभारंभ सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन विश्वमंगल मराठी फाउंडेशनच्या वतीने समस्त मराठी भाषिकांना करण्यात आले आहे.
विश्वमंगल मराठी फाउंडेशन शुभारंभ कार्यक्रम :,
दिनांक : शुक्रवार, ०१ मे २०२६,वेळ : सकाळी १०.०० वा.,
स्थळ : फ्रुटवाले धर्मशाळा, आळंदी, जि – पुणे