Home सामाजिक घटता जन्मदर, वाढते वंध्यत्व आणि बदलती लोकसंख्या रचना यावर महाराष्ट्रात गांभीर्याने विचार होणे आवश्यक – समृद्ध मातृत्व अभियान

घटता जन्मदर, वाढते वंध्यत्व आणि बदलती लोकसंख्या रचना यावर महाराष्ट्रात गांभीर्याने विचार होणे आवश्यक – समृद्ध मातृत्व अभियान

16 second read
0
0
5

no images were found

घटता जन्मदर, वाढते वंध्यत्व आणि बदलती लोकसंख्या रचना यावर महाराष्ट्रात गांभीर्याने विचार होणे आवश्यक – समृद्ध मातृत्व अभियान

समृद्ध मातृत्व अभियानाच्या राष्ट्रीय उपक्रमाला कोल्हापुरातून दिशा; नवी दिल्ली येथे ५ व ६ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय स्तरावर व्यापक चर्चा.

    नवी दिल्ली : भारतातील घटता एकूण प्रजनन दर (TFR), वाढती वंध्यत्वाची समस्या आणि त्यातून भविष्यात निर्माण होणाऱ्या लोकसंख्याशास्त्रीय बदलांवर व्यापक आणि दीर्घकालीन विचार करण्याच्या उद्देशाने समृद्ध मातृत्व अभियानाच्या वतीने ५ व ६ ऑगस्ट २०२६ रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय स्तरावरील विचारमंथन आयोजित करण्यात आले.*

भारताचा एकूण प्रजनन दर (Total Fertility Rate – TFR) १.८ पर्यंत घसरला असून, लोकसंख्येच्या स्थिर पुनरुत्पादनासाठी आवश्यक असलेल्या २.१ या प्रतिस्थापन पातळीपेक्षा तो कमी आहे. महाराष्ट्राचा प्रजनन दर तर १.४ इतका खाली आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह कमी प्रजनन दर असलेल्या राज्यांमध्ये भविष्यातील कार्यक्षम वयोगटातील लोकसंख्या, वृद्धांची वाढती संख्या, आरोग्य व्यवस्था, सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक विकास यावर होणाऱ्या परिणामांचा वेळीच अभ्यास करण्याची गरज आहे.

भारताची तरुण लोकसंख्या ही देशाची मोठी ताकद आहे. कृषी, उद्योग, विज्ञान, तंत्रज्ञान, संरक्षण, नवोपक्रम आणि आर्थिक विकास या सर्व क्षेत्रांसाठी सक्षम मनुष्यबळ अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे बदलती लोकसंख्या रचना हा केवळ लोकसंख्येचा विषय नसून देशाच्या *दीर्घकालीन आर्थिक, सामाजिक, आरोग्यविषयक आणि राष्ट्रीय क्षमतेशी संबंधित विषय* आहे.

वंध्यत्वाकडे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने पाहण्याची गरज

घटत्या प्रजनन दरासोबतच वंध्यत्वाची समस्या देखील गंभीरपणे समोर येत आहे. वाढते वय, शहरीकरण, बदलती जीवनशैली, ताणतणाव, लठ्ठपणा, मधुमेह, महिलांमधील PCOS व एंडोमेट्रिओसिस, पुरुष प्रजनन क्षमता तसेच पर्यावरणीय प्रदूषण, कीटकनाशके आणि इतर रासायनिक घटकांचा प्रजनन आरोग्यावर होणारा परिणाम यांचा सखोल अभ्यास होणे आवश्यक आहे.

वंध्यत्वाच्या समस्येकडे केवळ वैयक्तिक किंवा कौटुंबिक समस्या म्हणून न पाहता *सार्वजनिक आरोग्याचा महत्त्वाचा विषय* म्हणून पाहण्याची गरज आहे. वेळेवर तपासणी, योग्य समुपदेशन, परवडणारे उपचार आणि जनजागृतीच्या माध्यमातून अधिकाधिक दाम्पत्यांना मदत उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

महाराष्ट्रासह अनेक राज्यात विशेष नियोजनाची गरज आहे. तसेच महाराष्ट्रातील कमी झालेला प्रजनन दर लक्षात घेता, भविष्यात कार्यक्षम वयोगटातील लोकसंख्या कमी होणे आणि वृद्ध लोकसंख्येचे प्रमाण वाढणे यासारख्या परिस्थितींचा राज्याला सामना करावा लागू शकतो. त्यामुळे आरोग्यसेवा, सामाजिक सुरक्षा, वृद्धांची काळजी, मनुष्यबळ नियोजन आणि आर्थिक विकास याबाबत राज्याने दीर्घकालीन नियोजन करणे आवश्यक आहे.

समृद्ध मातृत्व अभियानाच्या वतीने प्रजनन आरोग्य आणि वंध्यत्व उपचार अधिक *सुलभ, परवडणारे आणि गुणवत्तापूर्ण* करण्यावर भर देण्यात आला आहे. सरकारी वैद्यकीय महाविद्यालये व जिल्हा रुग्णालयांमध्ये टप्प्याटप्प्याने *IVF, IUI आणि इतर प्रजनन उपचार सेवा* उपलब्ध करून देण्याबरोबरच आर्थिकदृष्ट्या दुर्बल दाम्पत्यांना आर्थिक सहाय्य देण्याचा विचार व्हावा, अशी भूमिका मांडण्यात आली आहे.

तसेच राष्ट्रीय प्रजनन आरोग्य व प्रजनन क्षमता मिशन, National Fertility & Infertility Registry, प्रत्येक राज्यात Centre of Excellence for Reproductive Medicine, राष्ट्रीय लोकसंख्याशास्त्रीय व प्रजनन आरोग्य धोरण आणि भारताच्या भविष्यातील लोकसंख्या, मनुष्यबळ व वृद्ध लोकसंख्येचा दीर्घकालीन अभ्यास करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.

समृद्ध मातृत्व अभियानाचे मत आहे की हा विषय राजकीय वादाचा नसून *वैज्ञानिक अभ्यास, विश्वसनीय आकडेवारी, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि राष्ट्रीय सहमतीच्या आधारे दीर्घकालीन धोरण ठरविण्याचा विषय* आहे.

डॉ. वर्षा पाटील*यांनी सांगितले की, भारताची तरुण लोकसंख्या ही देशाची सर्वात मोठी ताकद आहे. बदलत्या लोकसंख्याशास्त्रीय परिस्थितीकडे भीती किंवा चिंतेच्या दृष्टीने न पाहता, भविष्यासाठी योग्य नियोजन करण्याची संधी म्हणून पाहिले पाहिजे. वैज्ञानिक संशोधन, विश्वसनीय आकडेवारी, व्यापक जनसंवाद आणि दूरदृष्टीपूर्ण धोरणांच्या माध्यमातून भारत आपली लोकसंख्याशास्त्रीय ताकद पुढील अनेक दशकांपर्यंत टिकवून ठेवू शकतो.

### **उद्घाटन समारोहास देशभरातील मान्यवरांची उपस्थिती**

**कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया, नवी दिल्ली** येथे आयोजित **समृद्ध मातृत्व अभियानाच्या उद्घाटन समारोहास** देशभरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, लोकप्रतिनिधी, धोरणकर्ते, प्रशासकीय अधिकारी, वैद्यकीय तज्ज्ञ तसेच सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर *पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजी*, *केंद्रीय आयुष मंत्री तथा आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाशी संबंधित मंत्री श्री. प्रतापराव जाधवजी*, *केंद्रीय आरोग्य मंत्री श्री. जे. पी. नड्डा यांच्या धर्मपत्नी व भारतीय ऑलिम्पिक संघाच्या अध्यक्षा डॉ. मल्लिका नड्डाजी*, *कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान खासदार श्री. जगदीश शेट्टर*, *बिहारचे खासदार श्री. सुधाकर सिंह*, *पश्चिम बंगालचे खासदार डॉ. जयंत रॉय*, *राज्यसभा सदस्य खासदार श्री. धनंजय महाडिक ,राज्यसभा सदस्य खासदार डॉ. अजित गोपचडे*, *श्री. अण्णासाहेब जोल्ले*, *खासदार श्री. प्रदीप गांधी ,खासदार श्री. सदानंद तानवडे , खासदार डॉ. अनिल बोंडे*, *माजी केंद्रीय मंत्री श्री. संजय पासवान , कर्नाटकच्या आमदार श्रीमती शशिकला जोल्ले*, *श्री. पी. सी. गाडीगौडर*, *श्री. रमेश जिगजिणगी*, *सांगलीचे खासदार श्री. विशाल पाटील*, *हातकणंगलेचे खासदार श्री. धैर्यशील माने*, *शिराळ्याचे आमदार श्री. सत्यजित देशमुख*, *अयोध्याचे खासदार श्री. अवधेश प्रसाद*, *दिल्लीच्या आरोग्य विभागाच्या सचिव डॉ. रश्मी सिंह*, *ICMRचे डॉ. विक्रमसिंह* तसेच समृद्ध मातृत्व अभियानाच्या प्रमुख डॉ. वर्षा पाटीलजी*यांची प्रमुख उपस्थिती होती.

या राष्ट्रीय कार्यक्रमाला देशभरातून *300 हून अधिक सामाजिक सेवा संस्था व विविध क्षेत्रांतील प्रमुख संस्थांचे प्रतिनिधी तसेच 50 हून अधिक धोरणकर्ते (Policy Makers) आणि शासकीय अधिकारी* उपस्थित होते.

देशातील प्रजनन आरोग्य, घटता प्रजनन दर, वंध्यत्व आणि भविष्यातील लोकसंख्याशास्त्रीय आव्हाने या विषयांवर विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी या निमित्ताने विचारमंथन केले. विविध राज्यांतील लोकप्रतिनिधी, धोरणकर्ते, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ आणि सामाजिक संस्थांच्या सहभागामुळे या अभियानाला व्यापक राष्ट्रीय व्यासपीठ प्राप्त झाले.

समृद्ध मातृत्व अभियानाच्या प्रमुख डॉ. वर्षा पाटीलजी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या उपक्रमातून प्रजनन आरोग्य आणि बदलती लोकसंख्या रचना या विषयांकडे राष्ट्रीय पातळीवर गांभीर्याने पाहण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.समृद्ध मातृत्व अभियानाचा संदेश स्पष्ट आहे — मातृत्व, प्रजनन आरोग्य, वंध्यत्व आणि बदलती लोकसंख्या रचना हे केवळ आजचे प्रश्न नसून महाराष्ट्रासह संपूर्ण देशाच्या भावी पिढ्यांशी आणि राष्ट्रीय भविष्याशी संबंधित विषय आहेत.

 डॉ. वर्षा पाटील
राष्ट्रीय संयोजक, समृद्ध मातृत्व अभियान

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक
Comments are closed.

Check Also

IRCTCतर्फे दोन विशेष भारत गौरव यात्रा

IRCTCतर्फे दोन विशेष भारत गौरव यात्रा : पुरी–गंगासागर–बाबा बैद्यनाथ धाम आणि दिव्य राजस्थान…