no images were found
शहरातील वस्त्यांमध्ये मोफत आरोग्यसेवा पोहोचविणारा अद्ययावत फिरता दवाखाना सुरू : नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते नवीन वाहनाचे लोकार्पण
कोल्हापूर : शहरातील वस्त्या व झोपडपट्टी भागातील नागरिकांना त्यांच्या परिसरातच मोफत आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने सुरू असलेल्या मोफत फिरत्या दवाखान्यासाठी नवीन अद्यावत वाहनाचे लोकार्पण नामदार चंद्रकांतदादा पाटील, सौ अंजली पाटील यांच्या हस्ते आज भाजपा जिल्हा कार्यालयात करण्यात आले.
याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव, महेश जाधव, राहूल चिकोडे, अभय वंटे, यल्लाप्पा गाडीवडर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या फिरत्या दवाखान्यात एक डॉक्टर व एक सहाय्यक अशी टीम कार्यरत असून, दररोज दोन झोपडपट्टी किंवा वस्ती भागांमध्ये दवाखाना थांबवून नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाते. आठवड्यातील सहा दिवसांमध्ये १२ ठिकाणी हा दवाखाना पोहोचतो. दररोज अंदाजे १०० ते १२५ नागरिक या आरोग्यसेवेचा लाभ घेतात.
या उपक्रमामध्ये नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी, डॉक्टरांचा सल्ला, उपचार तसेच आवश्यक औषधांचे मोफत वितरण केले जाते. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या गरजू नागरिकांना त्यांच्या घराजवळच आरोग्यसेवा मिळत आहे.
नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून समाजाच्या विविध गरजा लक्षात घेऊन सातत्याने लोकहिताचे उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून हा फिरता दवाखाना शहरातील विविध वाड्या-वस्त्यांमध्ये जाऊन नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने आधार देत आहे.
नवीन अद्यावत वाहनामुळे या आरोग्यसेवेचा विस्तार अधिक प्रभावीपणे करता येणार असून, ‘आरोग्यसेवा नागरिकांच्या दारी’ या संकल्पनेला अधिक बळ मिळणार आहे.