no images were found
महिला सक्षमीकरण हीच खऱ्या अर्थाने काळाची गरज : पुनमताई तोडकर
पेठवडगाव (प्रतिनिधी) : “रस्ते आणि शहरांचा विकास कोणीही करू शकतं, पण खरी गरज आहे ती महिला सक्षमीकरणाची. एक महिला सक्षम झाली की कुटुंब सक्षम होते, कुटुंब सक्षम झाले की समाज सक्षम होतो आणि समाज सक्षम झाला तरच देशाच्या परिवर्तनाला खरी गती मिळते,” असे प्रतिपादन नरेंद्र मोदी विचार मंचच्या प्रदेशाध्यक्ष शर्विकाताई उर्फ पुनम तोडकर यांनी व्यक्त केले.
पेठवडगाव येथे १ ते ३ नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या भव्य खरेदी-विक्री प्रदर्शनामध्ये प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.
आपल्या भाषणात पुढे बोलताना त्यांनी महिला सक्षमीकरणावर विशेष भर दिला. नरेंद्र मोदी विचार मंचच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करताना स्त्री सक्षमीकरणाचा हाच संकल्प पुढे नेण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रदर्शनादरम्यान पुनम तोडकर यांनी उपस्थितांशी संवाद साधत शेतकरी आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी मार्गदर्शन केले. त्यांनी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या ‘शेती औषध फवारणी पंप’ योजनेची सविस्तर माहिती दिली. तसेच या योजनेचा जास्तीतोटी फायदा मिळवण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रियेबाबत उपस्थितांना माहिती दिली.
या प्रदर्शनात संस्थेच्या वतीने विशेष स्टॉल उभारण्यात आला आहे. या स्टॉलवर इच्छुक शेतकऱ्यांचे थेट अर्ज व फॉर्म भरून घेण्याची सोय करण्यात आली आहे. शासनाच्या आणि विविध कल्याणकारी योजना थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून त्यांना प्रत्यक्ष लाभ मिळवून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.
शेतकऱ्यांच्या हितासाठी, त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि ग्रामीण विकासासाठी हा सेवाभावी प्रवास असाच सातत्याने सुरू राहील, असा विश्वासही या प्रसंगी व्यक्त करण्यात आला. प्रदर्शनास नागरिकांचा व शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.