Home Uncategorized दुष्काळाशी लढताना निधी कमी पडू देणार नाही -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दुष्काळाशी लढताना निधी कमी पडू देणार नाही -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

14 second read
0
0
6

no images were found

दुष्काळाशी लढताना निधी कमी पडू देणार नाही -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य
  • सरसकट मदत,पीक विमाचारा आणि अन्नधान्यासाठी उपाययोजना
  • करजखेड्यात साठवण तलावासह नुकसानग्रस्त पिकांची बांधावर जाऊन पाहणी

धाराशिव, : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुळजापूर तालुक्यातील करजखेडा येथे थेट शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.कोरडा पडलेला साठवण तलाव आणि नुकसानग्रस्त पिकांची अवस्था पाहिल्यानंतर परिस्थिती गंभीर असली तरी शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये.दुष्काळाचा सामना करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील. कुठेही निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही.राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे,अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

      मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकरी बळी भोसले यांच्या शेताच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त ऊस आणि सोयाबीन पिकांची बारकाईने पाहणी केली. पेरणी कधी केली,पिकाला किती पाऊस मिळाला,पावसाचा खंड किती काळ राहिला आणि त्याचा पिकाच्या वाढीवर व संभाव्य उत्पादनावर काय परिणाम झाला, याची माहिती त्यांनी शेतकऱ्यांकडून घेतली.सोयाबीनचे पीक पूर्णपणे हातचे गेले असून उसाची वाढही खुंटल्याचे त्यांनी नमूद केले.पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे प्रत्यक्ष पाहणीतून दिसत असल्याचे सांगत शेतकऱ्यांना शासनाकडून सरसकट मदत केली जाईल,असे त्यांनी स्पष्ट केले.

      मुख्यमंत्री थेट बांधावर आल्याने परिसरातील शेतकरीही त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी पुढे आले. पावसाच्या खंडामुळे झालेले नुकसान,उत्पादनातील संभाव्य घट,हंगामासाठी केलेली गुंतवणूक आणि त्याचा कुटुंबाच्या अर्थकारणावर होणारा परिणाम त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडला. पावसाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांच्या भावना मुख्यमंत्र्यांनी ऐकून घेतल्या.मुलांचे शिक्षण बंद पडणार नाही आणि अडचणीच्या काळात शेतकरी कुटुंबांना आवश्यक आधार देण्याचा शासनाचा प्रयत्न राहील,अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली.

    दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आता उपलब्ध पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे काटेकोर नियोजन करावे लागणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.सध्याच्या परिस्थितीत पिके वाचविणे कठीण झाले आहे.त्यामुळे उपलब्ध पाणी सर्वप्रथम पिण्यासाठी राखून ठेवावे लागेल.पिण्याच्या पाण्याची गरज भागविल्यानंतर पाणी उपलब्ध राहिल्यासच त्याचा अन्य कारणांसाठी वापर करता येईल, असे त्यांनी सांगितले.

      पुढील चार ते पाच महिने कठीण असून या काळातून सर्वांना एकमेकांना धीर देत आणि सहकार्य करत मार्ग काढावा लागेल,असेही त्यांनी नमूद केले. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शासन सर्व आघाड्यांवर पावले उचलत असल्याचे सांगून मुख्यमंत्री  फडणवीस म्हणाले की,पीक कर्जमाफीचे काम सुरू आहे.पीक कापणीचे प्रयोगही सुरू असून पीक विम्याची मदत दिली जाईल. पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था करण्यात येईल.रब्बी हंगामासाठी पाण्याची उपलब्धता असल्यास त्यादृष्टीनेही तयारी केली जाईल. दुष्काळाचा सामना करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व उपाययोजना राबविताना निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

     शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफी आणि वीजबिल माफीचा निर्णय घेण्यात आला असून आता थेट आर्थिक मदतही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.शेतीचे उत्पन्न हातचे गेल्यामुळे शेतकरी कुटुंबांना अन्नधान्याची कमतरता भासणार नाही,यासाठीही आवश्यक उपाययोजना करण्यात येतील. पीक नुकसान,पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा,पीक विमा, आर्थिक मदत आणि अन्नधान्य अशा सर्व पातळ्यांवर शासन नियोजन करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

     करजखेड्यातील पाहणीदरम्यान शेतकऱ्यांशी मुख्यमंत्री फडणवीस यांनी थेट संवाद साधला.संकट मोठे आहे मात्र आपण सर्वजण एकमेकांना धीर देऊन आणि एकजुटीने त्यातून मार्ग काढू.शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार भक्कमपणे उभे राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

    या पाहणी दौऱ्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पालकमंत्री प्रताप सरनाईक, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले,खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चना पाटील,आमदार बसवराज पाटील, राणाजगजितसिंह पाटील व अभिमन्यू पवार,माजी आमदार ज्ञानराज चौगुले,जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, पोलीस अधीक्षक रितू खोखर, उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी आणि परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी सुरक्षा उपाययोजना करा

महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी सुरक्षा उपाययोजना करा आयटक संलग्न गोकुळ कर्मचारी संघटनेची …