no images were found
महायुतीकडून उमेदवारी मिळाली नाही, तर मंगेश चिवटे यांना राजर्षी शाहू विकास आघाडीची उमेदवारी देऊ आणि त्यांना ताकदीने निवडून आणू
*आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची कोल्हापूर येथे घोषणा
*पुणे शिक्षक मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला यावा यासाठी प्रयत्न करू , नाहीच आला तर मंगेश चिवटे यांना आमदार यड्रावकर यांनी सांगितलेली पर्यायी व्यवस्था उभी करून निवडून आणू शिवसेना खासदार धैर्यशील माने यांची घोषणा
जयसिंगपूर | कोल्हापूर:(प्रतिनिधी):-पुणे शिक्षक मतदारसंघातून “महायुतीच्या माध्यमातून मंगेश चिवटे यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. मात्र महायुतीकडून उमेदवारी मिळाली नाही, तर त्यांना राजर्षी शाहू विकास आघाडीची उमेदवारी देऊन ताकदीने निवडून आणू अशी घोषणा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आज कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथे केली.
तर, याच कार्यक्रमात बोलताना शिवसेना खासदार धैर्यशील माने यांनी पुणे शिक्षक मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला यावा यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू , नाहीच आला तर मंगेश चिवटे यांना आमदार यड्रावकर यांनी सांगितलेली पर्यायी व्यवस्था उभी करून निवडून आणू असे भाष्य करत आमदार यड्रावकर यांच्या भूमिकेचे समर्थन केले.
शिवसेनेचे इच्छुक उमेदवार मंगेश चिवटे यांच्या समर्थनार्थ सांगली – कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना खासदार – आमदारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने पुणे शिक्षक मतदारसंघ आपल्याकडे खेचण्यासाठी शिवसेना आणि भाजपामध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे.
जयसिंगपूर येथील शिक्षक मेळाव्यात बोलताना आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी मंगेश चिवटे यांच्या पाठीशी आपला ठाम पाठिंबा व्यक्त केला. “या शिक्षकांचा आशीर्वाद जोपर्यंत तुझ्या पाठीमागे आहे, तोपर्यंत तुला काळजी करण्याची गरज नाही. महायुतीकडून उमेदवारी मिळाली नाही , तर राजर्षी शाहू विकास आघाडीची उमेदवारी देऊन तुला निवडून आणू, एवढं अभिवचन तुला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो,” असे त्यांनी सांगितले.
निवडणुकीच्या तयारीबाबतही त्यांनी चिवटे यांना मार्गदर्शन करत “आता माघार घ्यायची नाही, पूर्ण ताकतीने इलेक्शन लढवायचे. आणि इलेक्शन कसे लढवायचे असते, याचा अभ्यास असलेल्या संजय पाटील-यड्रावकर यांना तुझ्याबरोबर देतो. त्या पद्धतीने आपण बरोबर ‘करेक्ट कार्यक्रम’ राबवू,” असेही नमूद केले.
तसेच आपल्या शिरोळ तालुक्यातील शिक्षक मतदारांबाबत बोलताना यड्रावकर म्हणाले की, “माझ्या तालुक्यामध्ये जवळपास ७५ हायस्कूल आणि कॉलेजेस आहेत. १,४०० पेक्षा अधिक मतं आमच्या शिरोळ तालुक्यामध्ये आहेत. त्या १,४०० पैकी १,२०० मतं तुला देण्याची व्यवस्था करतो,” असे त्यांनी जाहीरपणे सांगितले.
“तुझ्या पाठीमागे खंबीरपणे राहण्याचे आश्वासन देतो. हे बोगस नव्हे, तर खंबीर आश्वासन आहे,” असे सांगत राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी मंगेश चिवटे यांना पाठिंबा दर्शविला.
यड्रावकर यांच्या या जाहीर वक्तव्यामुळे पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय आणि शिक्षक वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. विशेषतः महायुतीकडून उमेदवारी न मिळाल्यास राजर्षी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून स्वतंत्रपणे मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याची भूमिका त्यांनी जाहीर केल्याने या वक्तव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
यावेळी खासदार मा. श्री. धैर्यशील दादा माने, जयसिंगपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष मा. संजय मामा यड्रावकर यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर आणि विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.