Home Video १४ व १५ मार्च रोजी कंदमुळांचे भव्य प्रदर्शन ; २५० हून अधिक कंदमुळे होणार प्रदर्शित

१४ व १५ मार्च रोजी कंदमुळांचे भव्य प्रदर्शन ; २५० हून अधिक कंदमुळे होणार प्रदर्शित

12 second read
0
0
11

no images were found

१४ व १५ मार्च रोजी कंदमुळांचे भव्य प्रदर्शन ; २५० हून अधिक कंदमुळे होणार प्रदर्शित

Oplus_131074

कोल्हापूर/ प्रतिनिधी: निसर्गात कंदमुळे देणाऱ्या अनेक वनस्पती आहेत.अनेक कंदमुळांच्या वनस्पती ह्या रानावनात, जंगलात वाढतात. अशा रानकंद वनस्पतींबाबतचे पारंपरिक ज्ञान वनवासी, आदिवासी आणि कोकणवासीयांच्याकडे आहे. अशाप्रकारच्या विविध रानकंदमुळांची ओळख आणि त्यांचा आहारातील वापर याबाबतची माहिती शहरवासियांना आणि खेड्यापाड्यातील ग्रामस्थांना व्हावी , शेतकऱ्यांनी त्यांची लागवड त्यांच्या शेतात करण्याच्या हेतूने “निसर्गअंकुर ” संस्थेच्या मार्गदर्शनाखाली “कोल्हापूर वुई केअर “आणि “एनजीओ कम्पॅशन २४” ह्या संस्थेच्या आयोजनातून तसेच श्री. शाहू छत्रपती शिक्षण संस्था,गार्डन्स क्लब ,युथ ऍनेक्स , वुई केअर हेल्पलाईन या संस्थांच्या सहकार्याने येत्या दिनांक १४ आणि १५ मार्च २०२६ रोजी २५०हून अधिक कंदमुळांचे माहितीपूर्ण शास्त्रीय प्रदर्शन कोल्हापूर शहरातील शहाजी कॉलेजच्या यशवंतराव चव्हाण सभागृह,दसरा चौक येथे आयोजित करण्यात आले आहे.
ह्या प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी १४ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, कोल्हापूरच्या प्रथम नागरिक महापौर सौ.रुपाराणी निकम, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, शाहू एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मानसिंग बोंद्रे, शहाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ.आर. के.शानेदिवाण, मुद्रांक जिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे, सिद्धगिरी नर्सरीचे सतीश कुलकर्णी यांच्या विशेष उपस्थितीत प्रदर्शनाचा सोहळा पार पडणार आहे. अशी माहिती वुई केअरचे प्रमुख मिलिंद धोंड यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
लोकांना कंदमुळांची ओळख आणि चांगली माहिती मिळावी म्हणून मोहन माने यांच्या अथक प्रयत्नातून हे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. अगदी पुरातन पौराणिक काळापासून मानव कंदमुळांचा अन्न म्हणून वापर करत आला आहे. शतावरी , अमरकंद , सफेद मुसळी ,पेन्वा,कळलावी, भुईकोहळा, कोष्ठकुलिंजन इत्यादी वनस्पतींच्या कंदाचा औषधात वापर करतात. गाजर, मुळा , बीट ,आले ,हळद , कांदा ,लसूण इत्यादी वनस्पतींच्या कंदाचा आपण आपल्या आहारात वापर करतो.अळू ,कमळकाकडी , शेवळा, सुरण हे कंदही भाजीसाठी वापरतात.साबुकंदापासून साबुदाणा तयार करतात. मानवी आहारात उपयुक्त असणाऱ्या अशा बहुतांश कंदवर्गीय वनस्पतींची शेतात लागवड केली जाते. या प्रदर्शनात कणगा ,काटे कणंग ,कोराडू ,करांदा, वराहकंद ,वासकंद ,पासपोळी , शेंडवेल ,कडुकंद, आळसी ,शेवळा , सुरण ह्या वनस्पतींची कंदमुळे , हवाई बटाटे, कंदीका आणि कंदक तसेच मोठा कासार अळू ,काळा अळू ,हिरवा अळू ,पांढरा पेरव , उंडे ,शेडवाळे असे अळुंचे विविध प्रकार आणि त्यांचे कंद , त्याचबरोबर काळी हळद ,आंबेहळद , रानहळद ह्या सारखे हळदीचे विविध प्रकार व त्यांचे कंद तसेच अमेरिकन अळू, चिनी बटाटे इ.विदेशी कंदमुळे अशाप्रकारच्या सुमारे २५० हुन अधिक प्रकारच्या कंदाच्या जाती, प्रजातींची मांडणी ह्या प्रदर्शनात केली जाणार आहे. अशी माहिती वनस्पती तज्ञ, निसर्गअंकुर संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.मधुकर बाचुळकर यांनी दिली.
कंदमुळांपासून विविध खाद्यपदार्थ कसे बनविले जातात, त्याच्या पाककृती या प्रदर्शनात पाहता येतील. तसेच या पदार्थांची चवही चाखता यावी यासाठी हे खाद्यपदार्थ खाण्यासाठी उपलब्ध असतील. काही कंदमुळे विक्रीसाठी ही असतील.
रानभाज्या, वृक्ष आणि औषधी वनस्पतींची माहिती असणारी पुस्तके विक्रीसाठी येथे उपलब्ध असतील.
प्रदर्शनात ठेवण्यात येणाऱ्या कंदांचे संकलन प्रामुख्याने कर्नाटकातील जोयडा,म्हैसूर,मंगळूर ,महाराष्ट्रातील बेल्हे ,नाशिक, मुरबाड, पालघर व गगनबावडा तसेच ओरिसा राज्यातील भुवनेश्वर आणि तामिळनाडू राज्यातील कोईमतूर, सेलम, वेल्लूर आणि केरळ राज्यातील वायनाड इ. भागातून आणली आहेत.
“लेट्स गेट बॅक टु अवर रूट्स “ह्या ब्रीदवाक्याचा अंगिकार करून आपल्या मातीत वाढणाऱ्या, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या आरोग्यवर्धक कंदमुळांची माहिती घेऊन चौकस आहारातून सुदृढ पिढी घडवण्यासाठी विद्यार्थी, अबालवृद्ध तसेच सर्व नागरिकांनी या एकमेव वैशिष्ट्यपूर्ण प्रदर्शनाचा लाभ अवश्य घ्यावा असे आवाहन “एनजीओ कम्पॅशन २४”, “कोल्हापूर वुई केअर “चे अध्यक्ष मिलिंद धोंड ह्यांनी केले आहे.
चॅनल बी हे प्रदर्शनाचे मीडिया पार्टनर असून गार्डन्स क्लब कोल्हापूर,सौ . मंजिरी कपडेकर कूकींग क्लासेस , प्रा.डॉ.एन.डी.पाटील महाविद्यालय, मलकापूर ,युथ ऍनेक्स आणि वुई केअर हेल्पलाईन ह्या संस्थांच्या मोलाच्या सहकार्याने हे प्रदर्शन पार पडणार आहे .
हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले तसेच प्रवेश विनामूल्य आहे.वेळ सकाळी १० ते सायंकाळी ७ पर्यंत असेल.
प्रदर्शनाचे प्रोजेक्ट चेअरमन सुशांत टक्कळकी असून को चेअरमन अमृता वासुदेवन आहेत .
पत्रकार परिषदेस वुई केअरचे प्रमुख मिलींद धोंड,निसर्ग अंकुर संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.मधुकर बाचुळकर, उपाध्यक्ष प्राचार्य डॉ.अशोक वाली,कंदमुळांचे अभ्यासक मोहन माने,गार्डन्स क्लबच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी,अभिजीत पाटील आदी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Video
Comments are closed.

Check Also

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन क…