no images were found
उस्मानाबाद शहरात कडकडीत बंद
उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातील आंदोलनाचा आज ६ वा दिवस आहे. शिवसेना उस्मानाबाद शाखेच्यावतीने आज उस्मानाबाद शहर बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्याला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे. यामुळे उस्मानाबादमध्ये कडकडीत बंद आहे.
शेतकऱ्यांना हक्काचा पीकविमा मिळावा म्हणून गेल्या सहा दिवसांपासून आमदार कैलास पाटील आमरण उपोषण करत आहेत. त्यांच्या समर्थनात आज उस्मानाबाद बंदचे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात आले होते.
उपोषणाला सहा दिवस झाले तरी सरकार प्रशासन लक्ष देत नाही म्हणून आंदोलन तीव्र करण्यात आलं आहे. काल दिवसभर शिवसैनिकांनी रास्ता रोको केला. जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळे लावणे, जलबैठे आंदोलन, अशी अनेक आंदोलनं केली. यानंतरही योग्य तो प्रतिसाद सरकारकडून मिळत नसल्याने आज उस्मानाबाद बंदचे आवाहन करण्यात आले. बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने शेतकऱ्यांचे विम्याचे पैसे तात्काळ द्यावेत, अन्यथा यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसैनिकाकडून दिला आहे.