
no images were found
नैसर्गिक शेतीमध्ये महिलांचे योगदान महत्वाचे -‘आत्मा’ उपसंचालक रवींद्र तागड
तळसंदे (प्रतिनिधी):- नैसर्गिक शेतीत महिलांचे योगदान महत्त्वाचे आहे. या माध्यमातून महिलांना आर्थिक स्वावलंबन व पर्यावरणपूरक शेतीची संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे महिला शेतकऱ्यानी नैसर्गिक शेतीकडे वळावे असे प्रतिपादन आत्मा कोल्हापूरचे उपसंचालक रवींद्र तागड यांनी केले. कृषी विज्ञान केंद्र, तळसंदे येथे राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत महिलांसाठी नैसर्गिक शेतीवरील ‘सखी प्रशिक्षण कार्यक्रमा’च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
भारतीय कृषी अनुसंधान संस्थान, नवी दिल्ली संलग्न डॉ. डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कृषी विज्ञान केंद्र, तळसंदे व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, आत्मा कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमान राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानाअंतर्गत ‘सखी प्रशिक्षण कार्यक्रम’ दिनांक १३ मे ते १७ मे २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या प्रशिक्षणात कोल्हापूर जिल्ह्यातील महिलांना नैसर्गिक शेतीविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. रवींद्र तागड यांनी आत्मामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच नैसर्गिक शेतीची आवश्यकता व महिलांचा सहभाग याबाबात मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख जयवंत जगताप यांनी केले. त्यांनि केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. त्यांनी केंद्रातील नैसर्गिक शेती प्रयोगशाळा, उत्पादन युनिट्स, प्रात्यक्षिक शेत आणि प्रशिक्षण व्यवस्थेचे महत्व अधोरेखित केले.
पाच दिवसीय प्रशिक्षणामध्ये प्रा. जयवंत जगताप यांनी नैसर्गिक शेतीमध्ये सेंद्रिय कर्बचे महत्त्व, माती आणि पाणी व्यवस्थापन याबद्दल मार्गदर्शन केले. प्रा. सुधीर सूर्यगंध यांनी कृषी आणि पशु एकत्रिकरण, राजवर्धन सावंत भोसले यांनी समुदाय संसाधन व्यक्तींचे कार्य, जबाबदाऱ्या आणि उद्दिष्टे, शेतकरी उत्पादक कंपनीचे कार्य आणि योजना या संदर्भात मार्गदर्शन केले. डॉ. निनाद वाघ यांनी जैव निविष्ठा व त्याचा वापर, प्रवीण माळी यांनी नैसर्गिक शेती, कीड व रोग व्यवस्थापन, अमोल गोरे यांनी नैसर्गिक शेतीची गरज यावर मार्गदर्शन केले. यावेळी डी वाय पाटील फार्म येथे सर्व महिला शेतकऱ्यांना बिजामृत, जीवामृत, घन जीवामृत, निमस्त्र, अग्निअस्त्र यासारख्या निविष्ठा पद्धतींचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
सांगता समारंभासाठी वारणा रिव्हर शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष प्रदीप साळोखे यांनी कृषी विस्तारातील त्यांची वाटचाल व त्यांनी स्थापन केलेल्या शेतकरी उत्पादक गट त्यातून केलेले कार्य याबाबत माहिती दिली. त्याचबरोबर महिला शेतकऱ्यांना एकत्रित येऊन नवनवीन योजनेचा लाभ घेऊन कोणते उपक्रम राबवू शकतात या संदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात हातकणंगले, शिरोळ, राधानगरी, पन्हाळा व शाहूवाडी तालुक्यांतील शेतकरी महिला प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमासाठी आत्मा कोल्हापूरच्या प्रकल्प संचालक रक्षा शिंदे, पन्हाळा ब्लॉक टेक्नीलॉजी मॅनेजर (बी. टी. एम.) आर. एस. चौगुले, पन्हाळा असिस्टंट टेक्निकल मॅनेजर (एटीएम) विश्वजीत पाटील, शाहूवाडी एटीएम सचिन कांबळे, हातकणंगले एटीएम वसीम मुल्ला, राधानगरी एटीएम सुनील कांबळे यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी विस्तार विशेषज्ञ राजवर्धन सावंत भोसले यांनी केले तर आभार हातकणंगले बी.टी.एम संदीप देसाई यांनी मानले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.