
no images were found
हवामान बदलाचा पावसावरील परिणामाचा सखोल अभ्यास आवश्यक: डॉ. हामझा वरिकोडण
कोल्हापूर,: हवामान बदल आणि त्याचा पावसावर होणारा परिणाम याचा सखोल अभ्यास करणे अत्यंत गरजेचे आहे, असे मत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी (IITM) येथील तज्ज्ञ डॉ. हामझा वरिकोडण यांनी व्यक्त केले.
गेल्या काही वर्षांत हवामान बदलामुळे अतिवृष्टीचे प्रमाण वाढले आहे. याचा फटका शेतकरी, नागरिक आणि स्थानिक प्रशासनाला बसत आहे. पूर, चक्रीवादळ, दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्ती निर्माण होऊ लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शिवाजी विद्यापीठाचा भूगोल अधिविभाग, हवामान बदल आणि शाश्वत अभ्यास केंद्र, पर्यावरण शास्त्र विभाग, पतंगराव कदम महाविद्यालय, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच डॉ. हाफजा वरिकोडण यांचे ‘हवामान बदल आणि अतिवृष्टी’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. आयआयटीएमचे डॉ. धियागसेन धर्मराज अध्यक्षस्थानी होते.
व्याख्यानात डॉ. वरिकोडण यांनी भारतातील मॉन्सून प्रणालीवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, भारतीय उन्हाळी मॉन्सून (ISM) जगातील सर्वात प्रमुख मॉन्सून प्रणालींपैकी एक आहे, जी दरवर्षी जून ते सप्टेंबर दरम्यान उद्भवते आणि जगातील एक चतुर्थांशपेक्षा अधिक लोकसंख्येच्या जीवनावर परिणाम करते. जागतिक तापमानवाढ ही दुष्काळ आणि महापुरासारख्या तीव्र घटनांमागील मुख्य कारण आहे. त्यामुळे भारतीय मॉन्सूनच्या प्रादेशिक गतिशीलतेतही बदल होतो. परिणामी, भारतातील महापूर आणि दुष्काळाच्या घटनांचे सखोल विश्लेषण करणे अत्यावश्यक आहे, कारण त्यांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर महत्त्वपूर्ण परिणाम होतो. डॉ. वरिकोडण यांनी विविध आधुनिक मॉडेल्सची माहिती दिली आणि हवामान अंदाजासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे महत्त्व स्पष्ट केले.
कार्यक्रमाला राणी पवार, आयआयटीएमचे प्रकल्प संशोधक अक्षय पाटील, शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे समन्वयक भूगोल अधिविभाग प्रमुख डॉ. सचिन पन्हाळकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, डॉ. दादा नाडे यांनी परिचय करून दिला. पर्यावरण शास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. आसावरी जाधव यांनी आभार मानले.