no images were found
विद्यापीठात ई-कचरा व्यवस्थापन केंद्राचे उद्घाटन
कोल्हापूर : इलेक्ट्रॉनिक कचरा निर्माण होऊच नये, याची दक्षता प्रत्येकाने आपापल्या स्तरावर घ्यायला हवी. याउपरही झाल्यास त्याचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने शिवाजी विद्यापीठाचे सेंटर फॉर ई-वेस्ट मॅनेजमेंट फार महत्त्वाचे आहे, असे मत कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी व्यक्त केले.
शिवाजी विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक्स अधिविभागात आज दुपारी कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते सेंटर फॉर ई-वेस्ट मॅनेजमेंटचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. शिर्के यांनी या केंद्राची फिरून पाहणी केली. त्यानंतर बोलताना ते म्हणाले, आज टेलिफोन, संगणक यांच्या बरोबरीने किंबहुना त्याहूनही अधिक मोबाईल संचांमुळे ई-कचरा निर्माण होण्याचे प्रमाण अधिक आहे. या कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करून त्यामधील उपयुक्त भागांचा पुनर्वापर करणे अगर त्यामध्ये काही बदल करून वापरण्यायोग्य बनविणे आवश्यक आहे. ई-कचरा ही आजची मोठी समस्या आहे. त्यावर उपाययोजना करण्याच्या कामी सदर केंद्राचे मार्गदर्शकाची भूमिका बजावावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. या केंद्राचा विद्यार्थ्यांनी लाभ करून घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी अधिविभाग प्रमुख डॉ. पवन गायकवाड यांनी स्वागत केले. केंद्र समन्वयक डॉ. मुरलीधर भानारकर यांनी आणि विद्यार्थ्यांनी केंद्राविषयी उपस्थितांना अवगत केले. यावेळी मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन यांच्यासह इलेक्ट्रॉनिक्स अधिविभागातील शिक्षक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.