
no images were found
आय.आय.एस.सी.’सोबत शिवाजी विद्यापीठ राबविणार संयुक्त संशोधन प्रकल्प
कोल्हापूर,(प्रतिनिधी):- भारतातील नवोन्मेषी संशोधन आणि विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा डीएसटी-पेअर (DST-PAIR)च्या ‘हब-अँड-स्पोक’ उपक्रमांतर्गत शिवाजी विद्यापीठ देशातील आघाडीच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळूर यांच्याशी ‘स्पोक’ म्हणून जोडले जात आहे. अशा पद्धतीच्या देशातील अवघ्या ३२ राज्य अकृषी विद्यापीठांपैकी शिवाजी विद्यापीठ एक ठरले आहे. विद्यापीठाच्या संशोधकीय दर्जावर या निमित्ताने राष्ट्रीय मोहोर उमटली आहे. केंद्रीय मंत्रालयाचे सचिव प्रा. अभय करंदीकर यांनी आज सकाळी संबंधित शैक्षणिक संस्थांसमवेत ऑनलाईन बैठक घेऊन ही घोषणा केली.
भारतीय विद्यापीठांची संशोधन व विकासाची क्षमता वाढवण्यासाठी केंद्राने स्थापित केलेल्या अनुसंधान नॅशनल रिसर्च फौंडेशन (ANRF) यांच्या अंतर्गत पार्टनरशीप फॉर अॅक्सिलरेटेड इनोव्हेशन अँड रिसर्च (PAIR) हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू केला. देशातील उच्च-स्तरीय संस्था आणि उदयोन्मुख संशोधन क्षमता असलेल्या विद्यापीठांमध्ये परस्पर संशोधन सहकार्य वाढवणे असा त्यामागील उद्देश आहे.
सदरचा पेअर कार्यक्रम हब-अँड-स्पोक मॉडेलद्वारे कार्य करेल. नोडल ‘हब’ म्हणून काम करणारी केंद्रीय संस्था देशभरात संशोधन आणि नवोपक्रम चालविण्यासाठी किमान सात संस्थांशी भागीदारी करेल. त्यांना यात ‘स्पोक’ असे संबोधले आहे. एन.आय.आर.एफ. रँकिंगमध्ये देशात पहिल्या स्थानी असलेल्या बंगळूरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सने या उपक्रमांतर्गत शिवाजी विद्यापीठाची स्पोक संस्था म्हणून निवड केली आहे. या उपक्रमाचा पहिला टप्पा आजच्या बैठकीमध्ये जाहीर करण्यात आला. या टप्प्यामध्ये सात उच्चस्तरीय संस्थांची नावे ‘हब’ म्हणून जाहीर करण्यात आली. त्यात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्ससह आयआयटी- इंदोर, आयआयटी- मुंबई, आयआयटी- रोपार, एनआयटी- रुरकेला, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्ली आणि केंद्रीय विद्यापीठ, हैदराबाद यांचा समावेश आहे. त्यांच्यासमवेत ‘स्पोक’ म्हणून संशोधनकार्य करण्यासाठी देशातील एकूण ४३ शैक्षणिक संस्थांची निवड करण्यात आली आहे. त्यात ३२ राज्य अकृषी विद्यापीठे, ६ केंद्रीय विद्यापीठे आणि ७ एनआयटी यांचा समावेश आहे. या ३२ राज्य विद्यापीठांमध्ये शिवाजी विद्यापीठाचा समावेश आहे.
प्रत्येक नेटवर्कला शंभर कोटींचा निधी
या प्रकल्पांतर्गत प्रत्येक हब-अँड-स्पोक नेटवर्कला १०० कोटी रुपयांचा निधी केंद्राकडून प्रदान करण्यात येणार आहे. यातील ३० टक्के निधी हब म्हणून काम करणाऱ्या संस्थेला आणि ७० टक्के निधी स्पोक म्हणून निवडलेल्या संस्थांसाठी असेल. हब असणारी संस्था आपल्याशी जोडलेल्या स्पोक संस्थांना संशोधकीय मार्गदर्शनाबरोबरच आवश्यक संसाधने, उपकरणे आणि सुविधा प्रदान करतील. त्यामुळे भारतभरात संशोधनाची एक सक्रिय अशी परिसंस्था निर्माण होणे, अभिप्रेत आहे.
या उपक्रमांतर्गत शिवाजी विद्यापीठ अॅडव्हान्स्ड मटेरियल सायन्समधील आधुनिक संशोधन करणार आहे. त्यात विद्यापीठाच्या नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी, रसायनशास्त्र, पदार्थविज्ञान, संगणकशास्त्र, संख्याशास्त्र आणि यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट (वाय.सी.एस.आर.डी.) या अधिविभागांतील संशोधकांचा सहभाग असणार आहे.
‘शिवाजी विद्यापीठाच्या दर्जेदार संशोधनकार्यावर शिक्कामोर्तब’
या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के म्हणाले की, ‘पेअर’सारख्या देशातील एका अत्यंत महत्त्वाकांक्षी संशोधकीय उपक्रमामध्ये शिवाजी विद्यापीठाची निवड होणे ही बाब अभिमानास्पद आहेच; पण, त्याच बरोबर देशातील रँकिंगमध्ये क्रमांक एकवर असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सबरोबर स्पोक म्हणून संशोधन करण्याची संधी मिळणे ही विद्यापीठाच्या संशोधकीय दर्जावर शिक्कामोर्तब करणारी बाब आहे.
‘आयआयएससी’सारख्या दिग्गज संस्थेसोबत संशोधन करण्याची संधी शिवाजी विद्यापीठातील संशोधकांना व विद्यार्थ्यांना मिळणार आहे. त्याचप्रमाणे त्या संस्थेतील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संशोधकांकडून मार्गदर्शन मिळाल्याने शिवाजी विद्यापीठाची एकूण संशोधन मानके उंचावण्याची आणि शैक्षणिक क्षेत्रात नवोपक्रमांना चालना मिळण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. हे संशोधन सहकार्य पुढील काळात अधिक वृद्धिंगत होत जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.