
no images were found
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्यावतीने
‘डब्ल्यूसी अॅम्पिकॉन’ आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न
कोल्हापूर (प्रतिनिधी):- डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लनरी रिसर्चच्या वैद्यकीय भौतिकशास्त्र विभागाच्यावतीने असोसिएशन ऑफ मेडिकल फिजिसिस्ट्स ऑफ इंडियाच्या सहकार्याने ‘डब्ल्यूसी अॅम्पिकॉन 2025’ ही आंतरराष्ट्रीय परिषद उत्साहात संपन्न झाली. या परिषदेत देशभरातील २५० हून अधिक वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ, अणुऊर्जा नियामक मंडळ, भाभा अणुसंशोधन केंद्र यांचे तज्ज्ञ आणि विद्यार्थी सहभागी झाले होते.
हॉटेल सयाजी येथे २६ आणि २७ एप्रिल रोजी रिसर्च डायरेक्टर प्रा. डॉ. सी. डी. लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिषदेचे उद्घाटन इंदिरा गांधी सेंटर फॉर अॅटोमिक रिसर्च, कल्पकमचे माजी संचालक आणि प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. शिवराम भोजे यांच्या हस्ते झाले. डॉ. भोजे यांनी खाणकाम क्षेत्रातील कामगारांमध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका आणि अत्याधुनिक किरणोत्सर्ग उपचार पद्धती याबाबत मार्गदर्शन केले.
वैद्यकीय भौतिकशास्त्र क्षेत्रात नवीन संशोधन आणि तंत्रज्ञान याबाबत या परिषदेत मार्गदर्शन करण्यात आले. परिषदेमध्ये ड्युअल एनर्जी सिटी, एमार लीनॅक, इमेज सिंथेसिस, आर्टिफिशियल इंटेलिजन्स यावर संशोधन सादर करण्यात आले. तसेच पीएसक्यूए, टोटल बॉडी ईरॅडीएशन (टीबीआय) आणि टोटल मॅरो अँड लिम्फोईड ईरॅडीएशन (टीएमएलआय) या विषयांवर पॅनेल चर्चासत्र आयोजित करण्यात आले. २७ एप्रिल रोजी कोल्हापूर कॅन्सर सेंटर येथे टीबीआय आणि टीएमएलआय विषयावर विशेष कार्यशाळा पार पडली. यावेळीसंयोजक श्री. थिरुनवुक्करासू मणि यांनी प्रत्यक्ष हाताळणीसह प्रशिक्षण दिले.
कोल्हापूर कॅन्सर सेंटर, श्री सिद्धिविनायक गणपती कॅन्सर हॉस्पिटल, अॅस्टर आधार हॉस्पिटल, होरायझन हॉस्पिटल आणि शिव कॅन्सर इन्स्टिट्यूट हे परिषदेचे सहप्रायोजक होते. कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा आणि कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.