no images were found
समाजातील दुर्लक्षीत, वंचित घटकांना पालकमंत्री यांच्या हस्ते रेशन कार्डचे वाटप
कोल्हापूर : तृतीयपंथीय, दिव्यांग, विधवा, परित्यक्ता व निराधार महिला तसेच सेक्स वर्कर्स अशा समाजातील दुर्लक्षीत वंचीत घटकांना कागदपत्रांअभावी तसेच माहितीच्या अभावामुळे शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या निर्देशानुसार व जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्या पुढाकारातून कोल्हापूर शहराचे अन्नधान्य वितरण अधिकारी नितीन धापसे पाटील यांनी विशेष शिबीराचे आयोजन करुन जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्थांशी समन्वय साधून अशा घटकांना अंत्योदय, प्राधान्य कुटुंब अशा शासकीय योजनांच्या माध्यमातून मोफत धान्य वितरीत करण्यासाठी 50 पेक्षा जास्त रेशन कार्ड तयार केले. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात या सर्व लाभार्थ्यांना रेशनकार्डचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण, अन्नधान्य वितरण अधिकारी नितीन धापसे पाटील उपस्थित होते.
सर्व लाभार्थ्यांना अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभ देण्यात आला असून पुढील महिन्यापासून या सर्व गरजूंना शासकीय मोफत धान्य मिळणार आहे. सर्व लाभार्थ्यांनी याबद्दल आनंद व्यक्त करत पालकमंत्री व जिल्हा प्रशासनाचे आभार मानले.