no images were found
दर्जेदार सुविधांमुळे आता देशाचे खेळाडू ऑलंपिकसह आशियाई गेम्समध्ये पदक विजेती कामगिरी करतील – निशिथ प्रामाणिक
कोल्हापूर ता.11 : दर्जेदार सुविधांमुळे आता देशाचे खेळाडू ऑलंपिकसह आशियाई गेम्समध्ये पदक विजेती कामगिरी करतील असा विश्वास केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री निशिथ प्रामाणिक यांनी व्यक्त केला. भारत सरकार युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालयाच्या खेलो इंडीया राष्ट्रीय क्रीडा विकास योजनेअंतर्गत कोल्हापूरातील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडीयममधील ॲस्ट्रो टर्फयुक्त मैदानाचा आज झालेल्या ऑनलाईन लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, माजी आमदार अमल महाडीक, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, सहा.आयुक्त संजय सरनाईक, डॉ.विजय पाटील, शहर अभियंता हर्षजीत घाटगे, उपशहर अभियंता एन.एस.पाटील, नगरसचिव सुनील बिद्रे, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, कनिष्ठ अभियंता अरुण गवळी, अनुराधा वांडरे उपस्थित होते. या लोकार्पणावेळी केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री निशिथ प्रामाणिक यांनी देशभरातील विविध ठिकाणांच्या 24 खेळाच्या मैदानांचे ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण केले.
केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री निशिथ प्रामाणिक यांनी यावेळी बोलताना देशातील विविध राज्यातील अनेक खेळाची मैदाने केंद्र सरकारच्या माध्यमातून विकसित केली आहेत. अत्याधुनिक सुविधानियुक्त अशी ही मैदाने ग्रामीणसह शहरी भागातील खेळाडूंना उपयोगी ठरतील असे सांगितले.
माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी कोल्हापूरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉकी स्टेडीयम व्हावे. याकरीता तत्कालीन केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. मात्र, केंद्रीय क्रीडा सचिवांनी कोल्हापूरात हॉकी खेळासाठी पोषक वातावरण आणि परंपरा नसल्याचा अहवाल दिला. याबाबतची खरी माहिती मंत्री रिजीजू यांना दिल्यानंतर त्यांनी मिनिट्स बनवत ५.५० कोटी रूपये खेलो इंडियातून कोल्हापूरला मंजूर केले. त्याला विद्यमान केंद्रीय क्रीडामंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनीही ताकद दिली. या मैदानात आता लाईट, पाणी, विद्यूतचा डीपी, पंच, खेळाडूंकरीता चेंजिंग रूम, सीसीटीव्ही कॅमेरे अशा सुविधा आवश्यक असल्याचे सांगितले.
माजी आमदार अमल महाडीक यांनी यावेळी बोलताना खासदार धनंजय महाडीक, तत्कालीन खासदार संभाजीराजे व आपण सर्वांच्या प्रयत्नातून या मैदानावर आंतरराष्ट्रीय दर्जाचा ॲस्ट्रो टर्फ उभारण्यात आला आहे. यासाठी सलग तीन वेळा महापालिकेच्या अधिकाऱ्यांना थेट दिल्लीलाही पाठविले होते. हे ग्राऊंड करताना आपण सर्वांनी खूप संघर्ष केला आहे. देशभरात कोल्हापूरची ओळख क्रीडानगरी अशी व्हावी, या उद्देशाने या मैदानाची उभारणी केली आहे. यापुढेही याच्या दुरुस्ती देखभालीकरीता राज्य व केंद्र सरकार कमी पडणार नाही. यासह सीएसआर निधीही उपलब्ध करून देवू. कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागातील खेळाडूंना चालना देण्यासाठी येणा-या कालावधीत उपनगरात आणखीन एक नवीन ग्राऊंड उभारण्यासाठी मी प्रयत्नशील आहे.
मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडीअम येथे ॲस्ट्रो टर्फयुक्त मैदाना विकसित करणे, अस्तित्वातील प्रेक्षक गॅलरी विकसित करणे, दक्षिण बाजूस नवीन प्रेक्षक गॅलरी विकसित करणे, तसेच प्रसाधनगृहे चेंजींग रुम इत्यादी सुविधा पुरविणे यांचा सविस्तर आराखडे रु.11.40 कोटीची तयार करण्यात आला होता. यापैकी केंद्र शासनाकडून रु.5.50 कोटीचा निधी प्राप्त झाला. उर्वरीत कामासाठी आवश्यक असणारा रु.1.50 कोटीचा निधी महानगरपालिकेने आपल्या स्वनिधीमधून खर्च करुन ॲस्ट्रो टर्फयुक्त मैदाना पूर्ण केले आहे. पुढील टप्यात मैदानालगत पश्चिमेकडील अस्तित्वातील प्रेक्षक गॅलरी, दक्षिण बाजूस नवीन प्रेक्षक गॅलरी, प्रसाधनगृहे, चेजिंग रुम, बैठक व्यवस्था इत्यादी विकसित करणे आवश्यक आहे. यासाठी रु.6.65 कोटी इतक्या रक्कमेची आवश्यकता आहे. तसेच सदर मैदानावर सराव आणि स्पर्धांसाठी फ्लड लाईटची सुविधा निर्माण करणेसाठी रु.1.70 कोटीची व ध्यानचंद हॉकी स्टेडिअम प्रॅक्ट्रीस ग्राऊंडसाठी वॉटर बेस्ड टर्फ बसविणेस रु.7.60 कोटीची आवश्यक आहे. ही सर्व कामे दुस-या टप्यात करण्यात येणार असून यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेने रु.15.95 कोटीचा प्रस्ताव शासनाकडे अंदाजपत्रकासह मंजूरीसाठी सादर केलेला आहे. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विजय वणकुंद्रे यांनी केले.
यावेळी विमला गोयंका इंग्लिश मेडियम स्कूल, दत्ताबाळ सेमी इंग्लिश स्कूल, डि.सी नरके विद्यानिकेतन शाळा कुडित्रे, संजीवन पब्लिक स्कूल पन्हाळा, प्रिन्स पद्माराजे हायस्कूल, न्यू हायस्कूल, दुधगंगा पब्लिक स्कूल इस्पुर्लीचे हॉकीचे विद्यार्थी, प्रशिक्षक व नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.