no images were found
महाराष्ट्र घडविणारी माणसं समजावून घ्या: मधुकर भावे
कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र आणि महाराष्ट्राला घडविणारी माणसं समजावून घेण्यास विद्यार्थ्यांनी प्राधान्य द्यावे, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासनामार्फत ‘लोकनेते बाळासाहेब देसाई आणि त्यावेळचा महाराष्ट्र’ या विषयावर आयोजित विशेष व्याख्यान प्रसंगी ते बोलत होते. राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर पाटणच्या मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराजे देसाई प्रमुख उपस्थित होते.
मधुकर भावे यांनी स्वातंत्र्यपूर्व काळापासून महाराष्ट्राच्या वाटचालीचा वेध घेऊन त्या वाटचालीतील बाळासाहेब देसाई यांचे योगदान आपल्या व्याख्यानात विषद केले. ते म्हणाले, साध्या माणसांच्या प्रामाणिकपणावर हे जग चालले आहे. त्या माणसांच्या कष्टाचे मोल जाणणारी माणसे म्हणजे यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई, वसंतदादा पाटील ही सारी नेतेमंडळी होती. त्यामुळे सर्वसामान्यांच्या उत्थानासाठीच त्यांनी अवघी हयात वेचली. त्यांच्या या कष्टातूनच आजचा महाराष्ट्र साकारला आहे.
राजकारणात आदरयुक्त दरारा कसा असावा, याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे बाळासाहेब देसाई असल्याचे सांगून भावे म्हणाले, महाराष्ट्रालाच नव्हे, तर संपूर्ण देशालाच दिशा देणाऱ्या अनेक योजना बाळासाहेबांच्या कारकीर्दीत साकार झाल्या. गृहमंत्री पदाच्या कारकीर्दीत मुंबईमध्ये गेट वे ऑफ इंडिया आणि शिवाजी पार्क या दोन्ही ठिकाणचे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे त्यांनी उभारले. वैशिष्ट्य म्हणजे एकही शासकीय रुपया खर्च न करता लोकवर्गणीतून ते उभारले. शिक्षण मंत्री पदाच्या कारकीर्दीत अल्प-मिळकत गटातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शुल्कात सवलतीची योजना त्यांनीच सुरू केली. महसूलचा कारभार पाहताना शेतकऱ्याला खातेपुस्तिका देण्याचा निर्णय घेतला. कृषी मंत्री म्हणून शेतामधील झाडे ही शेतकऱ्याच्या मालकीची करून देण्याचा निर्णय घेतला. कसेल त्याची जमीन, द्वि भार्या प्रतिबंधक कायदा, विरोधी पक्षनेत्याला मंत्रीपदाचा दर्जा देण्याचा निर्णय, एसटी महामंडळाच्या सेवेचा राज्यभरात विस्तार, बालगंधर्वाच्या एका विनंतीवरुन मराठी नाटकांवरील कर रद्द करण्याचा निर्णय असे एक ना अनेक लोकहिताचे निर्णय बाळासाहेब देसाई यांनी घेतले.
शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेमध्येही बाळासाहेब देसाई यांनी अतिशय कळीची भूमिका बजावल्याचे सांगून भावे म्हणाले, बाळासाहेब देसाई यांनी कोल्हापूर येथे एका दवाखान्यात दहा रुपये मजुरीवर झाडलोटीचे काम करून आपले शिक्षण घेतले. राजर्षी शाहू महाराजांनी वंचितांच्या शिक्षणासाठी केलेल्या कार्याबद्दल त्यांच्या मनात अतीव आदर होता. यशवंतराव चव्हाण आणि बाळासाहेब देसाई यांना बी.ए.ची पदवी घेण्यासाठी साठ रुपये खर्च करून मुंबईला जावे लागले होते. तेव्हा कोल्हापूरला शिवाजी विद्यापीठ व्हायलाच हवे, याविषयी त्यांचा मनोदय पक्का झाला. यशवंतरावांना विद्यापीठ कराडला व्हावे, असे वाटे, तर वसंतदादांना ते सांगलीला व्हावे, असे वाटे. तथापि, सातारचे असूनही बाळासाहेब मात्र विद्यापीठ कोल्हापूरलाच व्हावे, यासाठी आग्रही होते. मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर हा विद्यापीठाचा विषय चर्चेसाठी येणार असल्याचे समजले, तेव्हा बाळासाहेबांच्या अंगात प्रचंड ताप होता. तरीही ते बैठकीला उपस्थित राहिले. यशवंतरावांनी त्यांना कोल्हापूरबद्दल आश्वस्त केले आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरला स्थापन करण्याचा निर्णय झाला. अशी ही मोठी माणसे आपण समजून घ्यायला हवीत, त्यांचे जगणे समजून घ्यायला हवे आणि त्यांच्या आदर्शाबरहुकूम वाटचाल करण्याचा प्रयत्न करायला हवा, असेही त्यांनी सांगितले.
कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के अध्यक्षीय मनोगतात म्हणाले, कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठ व्हावे, असे स्वप्न राजाराम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळकृष्ण बाळगून होते. बाळासाहेब देसाई हे त्यांचे विद्यार्थी. म्हणजे गुरूने पाहिलेले स्वप्न विद्यार्थ्याने तडीस नेल्याचे हे एक दुर्मिळ पण महत्त्वाचे उदाहरण आहे. आजच्या पिढीपर्यंत त्यांचे कष्ट आणि द्रष्टेपण पोहोचणे आवश्यक आहे. सत्ता व पदाचा सदुपयोग जनतेच्या हितासाठीच करण्याचा आणि आपल्या कर्मभूमीप्रती कृतज्ञभाव बाळगण्याचा गुणधर्म बाळासाहेबांकडून शिकता येतो. एका साध्या विचाराचे धोरणात रुपांतर करण्याचे कर्तृत्व आणि धडाडी हा त्यांचा गुण आजच्या काळातही अनुकरणीय आहे, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक अध्यासनाचे समन्वयक डॉ. अवनिश पाटील यांनी केले. सुस्मिता खुटाळे यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. दत्ता मचाले यांनी आभार मानले. कार्यक्रमास डॉ. अरुण भोसले, व्ही.एस. पानस्कर, डॉ. ईस्माईल पठाण, डॉ. रणधीर शिंदे, दशरथ पारेकर, डॉ. भारती पाटील, डॉ. प्रकाश गायकवाड यांच्यासह देसाई कुटुंबातील सदस्य, शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.