no images were found
शाश्वत विकासासाठी संशोधन ही रसायनशास्त्राची सामाजिक, नैतिक जबाबदारी: डॉ. इंद्रजीत घोष
कोल्हापूर(प्रतिनिधी): शाश्वत विकासासाठी संशोधन हे रसायनशास्त्राच्या सामाजिक, नैतिक जबाबदारीचे अधोरेखन आहे, असे प्रतिपादन झेल रिपब्लिक येथील व्हीएसबी- टेक्निकल ओसावा युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक डॉ. इंद्रजीत घोष यांनी केले. शिवाजी विद्यापीठात ‘आधुनिक रसायनशास्त्राद्वारे शाश्वत विकास’ या विषयावर आयोजित एकदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव होत्या.
डॉ. घोष म्हणाले, हरित रसायनशास्त्र हे केवळ पर्यावरण संवर्धनाचे साधन नसून आर्थिकदृष्ट्या परवडणारा आणि सामाजिकदृष्ट्या जबाबदार विकासाचा मार्ग आहे. आपण निर्माण केलेली प्रत्येक अणुसंरचना, प्रत्येक प्रक्रिया आणि प्रत्येक उत्पादन हे भविष्यातील पिढ्यांसाठी महत्त्वाचा संदेश ठरणारे आहे, हे लक्षात घेऊन आपल्या संशोधनाच्या दिशा ठरविण्याचा हा कालखंड आहे. ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञान, नूतनीकरणीय कच्चा माल, जैव-उत्प्रेरण, सतत प्रवाही तंत्रज्ञान आणि शाश्वत अर्थव्यवस्थेच्या संकल्पना या भविष्यातील औद्योगिक प्रगतीसाठी अत्यावश्यक ठरणार आहेत.
अध्यक्षीय मनोगतात प्र-कुलगुरू डॉ. जाधव म्हणाल्या, आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य, सामाजिकदृष्ट्या न्याय्य आणि पर्यावरणीयदृष्ट्या संतुलित संशोधनाची आज सर्वच क्षेत्रांत आवश्यकता आहे. रसायनशास्त्राच्या क्षेत्रात ही जबाबदारी स्वीकारून या परिषदेत सर्वंकष चर्चा होत आहे, ही आनंदाची बाब आहे. शाश्वत विकास उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी रसायनशास्त्राची भूमिका अधोरेखित करत ही परिषद विज्ञान, उद्योग आणि समाज यांच्यातील सेतू म्हणून कार्य करेल. संशोधनातील आंतरशाखीय सहकार्य वाढीस लागण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील संशोधन प्रवाहांची ओळख करून देण्याच्या कामी महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते रोपास पाणी वाहून परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. परिषदेचे समन्वयक डॉ. संजय कोळेकर यांनी स्वागत केले. रसायनशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. संजय चव्हाण यांनी प्रास्ताविकात परिषदेच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. डॉ. संदीप संकपाळ यांनी आभार मानले.