no images were found
शिवाजी विद्यापीठ एआय आणि रोबोटिक्स संशोधन-विकास केंद्र उभारणार
कोल्हापूर : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), रोबोटिक्स आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात संशोधन, कौशल्यविकास आणि उद्योग-अकादमिक सहकार्याला चालना देण्यासाठी शिवाजी विद्यापीठाने स्टेमलर्न डॉट एआय (तीव्र एज्युटेक प्रा. लि.चा उपक्रम) यांच्याशी सामंजस्य करार केला आहे.
या करारांतर्गत विद्यापीठात अत्याधुनिक एआय व रोबोटिक्स संशोधन-विकास केंद्र स्थापन करण्याबरोबरच कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील १० संलग्न महाविद्यालयांमध्ये उत्कृष्टता केंद्रे आणि १०० शाळांमध्ये तंत्रज्ञान शिक्षण व कौशल्यविकासाचे कार्यक्रम राबविण्यात येतील. विद्यापीठातील संशोधनाला उद्योगांच्या गरजांशी जोडून विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख कौशल्ये आणि प्रत्यक्ष संशोधनाचा अनुभव देण्याच्या दृष्टीने हा करार महत्त्वपूर्ण आहे.
विद्यापीठाच्या ६४व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने काल हा करार करण्यात आला. त्यावर विद्यापीठाच्या वतीने कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी तर स्टेमलर्न डॉट एआयच्या वतीने सहसंस्थापक व संचालक प्रवीण गडेली यांनी स्वाक्षरी केल्या. यावेळी कुलगुरू डॉ. राजनीश कामत, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, केंद्रीय उच्चशिक्षण विभागाचे अतिरिक्त सचिव आनंदराव पाटील, केंद्रीय चर्म संशोधन संस्थेचे संचालक डॉ. पी. थनिकैवेलन यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कराराअंतर्गत पहिल्या टप्प्यात विद्यापीठात स्थापन होणाऱ्या संशोधन केंद्रात डीप लर्निंग, कॉम्प्युटर व्हिजन, रोबोटिक आर्म्स, मोबाईल रोबोटिक्स, ड्रोन आणि आयओटी यांसारख्या क्षेत्रांतील संशोधनासाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होतील. पढील टप्प्यात १० निवडक महाविद्यालयांमध्ये एआय व रोबोटिक्स उत्कृष्टता केंद्रे उभारली जातील, तर तिसऱ्या टप्प्यात या महाविद्यालयांच्या माध्यमातून प्रत्येकी १० शाळांमध्ये शिक्षक प्रशिक्षण, अभ्यासक्रम आणि विद्यार्थ्यांसाठी तंत्रज्ञान कौशल्यविकासाचे उपक्रम राबविले जातील.
पश्चिम महाराष्ट्राच्या कृषी व औद्योगिक अर्थव्यवस्थेशी निगडित ऊस-साखर उद्योग, दुग्धव्यवसाय, फाउंड्री आणि वस्त्रोद्योग या चार क्षेत्रांवर संशोधनाचा विशेष भर असेल. ऊस शेतीतील पीक उत्पादन व सिंचन व्यवस्थापन, दुग्धव्यवसायातील गुणवत्ता तपासणी व शीतसाखळी, फाउंड्री उद्योगातील उत्पादन दोष शोधणे व यंत्रांची पूर्वानुमानित देखभाल, तसेच वस्त्रोद्योगातील कापड गुणवत्ता तपासणी यांसाठी एआय आधारित तांत्रिक उपाय विकसित केले जातील. यामुळे स्थानिक सहकारी संस्था आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना विद्यापीठाच्या संशोधनाचा प्रत्यक्ष लाभ मिळू शकेल.
विद्यार्थ्यांना राष्ट्रीय अप्रेंटिसशिप प्रशिक्षण योजना (NATS), अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम (AEDP) आणि बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग (BOAT) यांच्या माध्यमातून उद्योगांशी संलग्न, क्रेडिट-आधारित प्रशिक्षण व अप्रेंटिसशिपच्या संधी उपलब्ध होतील. एआय, रोबोटिक्स, डेटा सायन्स, कॉम्प्युटर व्हिजन आणि आयओटी क्षेत्रांतील प्रकल्पाधारित शिक्षणामुळे त्यांची रोजगारक्षमता व संशोधन क्षमता वाढण्यास मदत होईल. शिक्षकांना अद्ययावत तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण, अभ्यासक्रम विकास आणि संशोधन मार्गदर्शन मिळेल. पीएच.डी. व एम.टेक. संशोधकांनाही तज्ज्ञांच्या सहकार्याने प्रत्यक्ष समस्यांवर आधारित संशोधनाची संधी मिळणार आहे. शालेय स्तरावर संगणकीय विचारक्षमता, एआय आणि रोबोटिक्सची ओळख करून देताना मराठी भाषेत अभ्यासक्रम उपलब्ध करण्यासाठी अनुवादिनी एआयचा उपयोग केला जाणार आहे.
आधुनिक तंत्रज्ञान प्रशिक्षणासाठी महत्त्वाचा करार: कुलगुरू डॉ. कामत
कुलगुरू डॉ. राजनीश कामत म्हणाले, एआय आणि रोबोटिक्सच्या माध्यमातून विद्यापीठातील संशोधन क्षमता, शिक्षकांचे ज्ञान आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता उद्योगांच्या प्रत्यक्ष गरजांशी जोडण्याची मोठी संधी या करारामुळे निर्माण झाली आहे. विद्यापीठापासून संलग्न महाविद्यालये आणि शाळांपर्यंत तंत्रज्ञान शिक्षणाचे जाळे विस्तारल्यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण मिळेल. पश्चिम महाराष्ट्रातील कृषी, सहकार आणि औद्योगिक क्षेत्रांच्या समस्या सोडविण्यासाठी स्थानिक पातळीवर संशोधन व तंत्रज्ञान विकसित करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल.
यावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, अधिष्ठाता डॉ. राजाराम गुरव, डॉ. महादेव देशमुख, डॉ. अजय साळी, डॉ. वर्षा मैंदर्गी, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. रघुनाथ ढमकले, डॉ. बबन सातपुते, संगणकशास्त्र अधिविभागाच्या प्रमुख डॉ. कविता ओझा, डॉ. कबीर खराडे, डॉ. सावलीराम घाणे, डॉ. सागर डेळेकर यांच्यासह शिक्षक, अधिकारी उपस्थित होते.