no images were found
महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून रुग्णालयांना १२६. कोटी ३३ लाख रुपयांचे वितरण : ऑक्टोबर महिन्यात ८,४८५ दाव्यांपोटी १९ कोटी ८ लाख रुपये अदा
कोल्हापूर, : आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू असून, या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत उपलब्ध करून दिले जात आहेत. फेब्रुवारी २०२६ पासून आजपर्यंत जिल्ह्यातील ५१ हजारांहून अधिक लाभार्थ्यांना ८९ हजार ९४ उपचारांचा लाभ देण्यात आला आहे.
जिल्ह्यात या योजनेंतर्गत एकूण २४१ रुग्णालये अंगीकृत आहेत. यामध्ये १२५ शासकीय आणि ११६ खासगी रुग्णालयांचा समावेश आहे. या रुग्णालयांच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना विविध आरोग्य उपचारांची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.
योजनेंतर्गत फेब्रुवारी २०२६ पासून आजपर्यंत शासकीय व खासगी अंगीकृत रुग्णालयांना एकूण ४६ हजार ४८९ दाव्यांपोटी १२६.३३ कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत. ऑक्टोबर २०२६ या एकाच महिन्यात ८ हजार ४८५ दाव्यांपोटी १९.८ कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. अंगीकृत रुग्णालयांना दाव्यांची रक्कम अदा करण्याची प्रक्रिया सातत्याने सुरू आहे.
दरम्यान, सध्या शासकीय व खासगी अंगीकृत रुग्णालयांचे एकूण ३२ हजार ४५८ दावे, १२०.९ कोटी रुपयांच्या रकमेसह प्रलंबित आहेत. या दाव्यांची वैद्यकीय लेखापरीक्षण, तपासणी, छाननी व मंजुरी अशा विविध स्तरांवर प्रक्रिया सुरू असून, आवश्यक पडताळणी पूर्ण करून नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.
लाभार्थ्यांना दर्जेदार व मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे, तसेच अंगीकृत रुग्णालयांच्या उपचार दाव्यांची प्रक्रिया नियमानुसार पूर्ण करणे, यासाठी राज्य आरोग्य हमी सोसायटी प्रयत्नशील आहे. पात्र रुग्णांना उपचारांपासून वंचित राहावे लागू नये आणि योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचावा, यासाठी आवश्यक कार्यवाही सातत्याने सुरू आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सरिता थोरात यांनी दिली आहे.