
no images were found
बंजारा समाजाच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्वतोपरी. -लोकसभा अध्यक्ष ओम बिरला
नवी दिल्ली, बंजारा समाज हा संस्कृती आणि संस्कार जपणारा आहे. माझ्या मतदार संघात ह्या समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात असून त्यांच्या प्रश्नांची मला जाण आहे. या समाजाच्या अडचणी दूर करण्याचा निश्चित प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय सभागृहामध्ये संत सेवालाल चॅरीटेबल ट्रस्टच्यावतीने ‘बंजारा महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले. याअंतर्गत संत सेवालाल यांची 286 वी जयंती आणि रूप सिंग महाराज जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
लोकसभा अध्यक्ष श्री बिर्ला म्हणाले, संत सेवालाल यांनी मानवतेचा संदेश दिला. पर्यावरण संवर्धनाचे काम या समाजाने केले. गुरू-शिष्य पंरपरा टिकवून हा समाज पुढे जातो, असेही श्री.बिर्ला म्हणाले.
राजस्थानमधील कोटा या मतदारसंघात बंजारा समाजाची संख्या मोठी असल्याचे सांगत श्री बिर्ला म्हणाले, बंजारा समाजाची बोलीभाषा, खानपान, वेशभुषा एक समान असूनही वेगवेगळया राज्यात वेगवेगळया वर्ग घटकात हा समाज मोडतो. त्याचा अभ्यास करून या समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येईल.
तरुण पिढीला शिक्षण घेऊन पुढे येण्याचे आवाहन करत श्री बिर्ला म्हणाले, महाराष्ट्र शासनाने बंजारा समाजाच्या लोक पंरपरेवर आधारीत संग्रहालय बनवून त्यांच्या पंरपरेला जोपासण्याचे आणि पुढीच्या पिढीपर्यंत पोहचविण्याचे मोलाचे काम केले आहे.