no images were found
बिरसा मुंडा जयंतीनिमित्त महापालिकेत अभिवादन; १७ नोव्हेंबरला शहरात आरोग्य व पोषण जनजागृती शिबिर
कोल्हापूर, : भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने आज महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस उपमहापौर अक्षय जरग यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कनिष्ठ लिपिक सुनील गेजगे, अरुण जमादार, प्रीतम वडगावकर यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान, भगवान बिरसा मुंडा जयंती व जनजातीय गौरव दिन सेवा सप्ताह २०२६ निमित्त महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत मंगळवार, दि. १७ नोव्हेंबर रोजी शहरात भव्य आरोग्य व पोषण जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शहरातील सर्व ११ नागरी आरोग्य केंद्रे, २८ आरोग्यवर्धिनी केंद्रे तसेच महापालिकेच्या अधिपत्याखालील सर्व रुग्णालयांमध्ये सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत हे शिबिर एकाच दिवशी आयोजित करण्यात येणार आहे. या शिबिरात नागरिकांची सर्वसाधारण आरोग्य तपासणी, रक्तदाब व मधुमेह तपासणी करण्यात येणार आहे. तसेच सिकलसेल आजाराबाबत जनजागृती करून आवश्यकतेनुसार तपासणी व संदर्भसेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. गर्भवती माता, स्तनदा माता व बालकांच्या आरोग्याची तपासणी, लसीकरण तसेच पोषणविषयक मार्गदर्शनही करण्यात येणार आहे.
या शिबिराचा लाभ शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.