
no images were found
श्रीलंका, पाकिस्तानपेक्षाही भारताची स्थिती गंभीर
नवी दिल्ली : ग्लोबल हंगर इंडेक्सचा ताजा अहवाल 121 देशांच्या यादीत भारत 107 व्या क्रमांकावर आहे. ग्लोबल हंगर इंडेक्स हे जागतिक, प्रादेशिक आणि राष्ट्रीय स्तरावर भूकेचे सर्वसमावेशक मोजमाप आणि मागोवा घेण्यासाठीचे एक साधन असून, GHI स्कोअरची गणना 100-पॉइंट स्केलवर केली जाते. ज्यावरून संबंधित देशातील भुकेची तीव्रता दर्शवली जाते. यात शून्य हा सर्वोत्तम स्कोअर असतो आणि 100 हा सर्वात वाईट स्कोअर मानला जातो. ताज्या स्कोअरनुसार भारताचा स्कोअर 29.1 असून, जो देशाच्यादृष्टीने गंभीर मानला जात आहे.
भारताच्या शेजारी देशांमध्ये परिस्थिती चांगली असून, येथील भूकस्थिती निर्देशांकात श्रीलंका 64, नेपाळ 81 आणि पाकिस्तान 99 व्या स्थानावर आहे. दक्षिण आशियातील अफगाणिस्तान हा एकमेव देश असा आहे जो 109 व्या क्रमांकावर असून, येथील भूक संकट भारतापेक्षाही गंभीर आहे. तर, चीनचा स्कोअर 5 पेक्षा कमी आहे. त्यामुळे भारताचा शेजारी पाकिस्तान आणि श्रीलंकेपेक्षाही भारताची स्थिती भीषण असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. 2021 मध्ये जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार या यादीत भारत 101 व्या स्थानावर होता.
मात्र, यावर्षीच्या आकडेवारीनुसार त्यामध्ये आणखीन सहा अंकांची घसरण झाली आहे. देशातील कुपोषित लोकांच्या संख्येतदेखील दिवसेंदिवस वाढ होत असून, 2018-2020 मध्ये 14.6 टक्क्यांवरून ही आकडेवारी 2019-2021 मध्ये 16.3 टक्क्यांवर नोंदवली गेली आहे. याचाच अर्थ भारतातील 224.3 दशलक्ष लोक कुपोषित असल्याचे दिसून येत आहे. जागतिक स्तरावर कुपोषित लोकांची एकूण संख्या 828 दशलक्ष आहे.