
no images were found
‘वीर हनुमान’मधील वाली, सुग्रीव, अंजनी, केसरी आणि बाल हनुमानाचा भव्य लुक
एका अवखळ बालकापासून ते दिव्य रक्षकापर्यंतचा हनुमानाचा प्रवास दाखवणारी सोनी सबवरील ‘वीर हनुमान’ ही मालिका भारताच्या अत्यंत लाडक्या दैवताचे जीवन चरित्र उलगडून दाखवते. 11 मार्च पासून सुरू होत असलेली ही मालिका दर सोमवार ते शनिवार रात्री 7.30 वाजता प्रसारित करण्यात येणार आहे. या मालिकेत हनुमानाच्या फारशा न ऐकलेल्या गोष्टी खूप मोठ्या पटलावर, बारकाईने बनवलेल्या सेट्सवर, सुंदर व अनुरूप वेशभूषेच्या आणि असामान्य व्यक्तिरेखांच्या माध्यमातून उलगडत जातील. निर्मात्यांनी वाली आणि सुग्रीव (माहिर पांधी), अंजनी (सायली साळुंखे), केसरी (आरव चौधरी) आणि बाल हनुमान (आन तिवारी) या मालिकेतल्या प्रमुख व्यक्तिरेखांचे फर्स्ट लुक उघड केले आहेत. ज्या त्या व्यक्तिरेखा अधिक उठावदार करण्यासाठी बारीक कलाकुसर केलेले पोशाख, सुंदर आभूषणे आणि नेमका मेकअप सारख्या सर्व पैलूंवर लक्ष देण्यात आले आहे.
‘वीर हनुमान’मधील प्रत्येक व्यक्तिरेखेचा लुक विशिष्ट आहे. त्यांच्या भूमिकेचे सार त्यामध्ये आहे. माहिर पांधी वाली आणि सुग्रीव या अत्यंत भिन्न प्रकृतीच्या दोन भावांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यांचा लुक तसा केला आहे. वाली भयंकर आणि योद्ध्यासारखा दिसतो आणि त्याचे केस तपकिरी व रुक्ष आहेत. त्याच्या लाल आणि जांभळ्या रंगाच्या पोशाखातून त्याची महत्त्वाकांक्षा झळकते. आणि आपली उपस्थिती दमदार करण्यासाठी तो ऐरावत-थीमची आभूषणे परिधान करतो. दुसरीकडे, सुग्रीवचा लुक सौम्य आहे. त्याचे केस खांद्यापर्यंत लांब आहेत आणि तो नक्षीदार आभूषणे परिधान करतो. त्याचा पिवळा-हिरवा कॉस्च्युम अजिंठा आणि वेरूळच्या लेण्यांमधून प्रेरित आहे. त्यातून त्याची भक्ती आणि समंजसपणा दिसतो.
अंजनीच्या भूमिकेत सायली साळुंखेमध्ये एक डौल आणि दिव्यत्व दिसते. ती एखाद्या अप्सरेसारखी दिसते. कुमारतुली येथील मूर्ती कलाकारांनी हा लुक दिला आहे. या अप्सरेचा मुकुट शोला म्हणजे लाकडाच्या पातींनी बनलेला आहे. तिचा मेकअप आणि स्टाइलिंग अल्पोना आर्टमधून प्रेरित आहे, जो तिच्या दिव्य लुकला ऐश्वर्य प्रदान करतो. वानरराज केसरीची भूमिका करणाऱ्या आरव चौधरीला मस्टर्ड-लाल रंगाचा विणलेला पोशाख दिला आहे. त्याच्या मुकुटात भारताच्या प्राचीन पर्वतांची आणि प्रांताची झलक दिसते. त्याच्या वेशभूषेतून एक योद्धा आणि एक पिता म्हणून त्याचे सामर्थ्य आणि त्याचे सदाचरण झळकते.
आन तिवारी हा बाल कलाकार पडद्यावर बाल हनुमानाची निष्पाप आणि असीम ऊर्जा जिवंत करणार आहे. त्याच्या लुकमधून त्याचा खेळकरपणा दिसून येतो. आपल्या खास शैलीत तो एक भली मोठी गदा देखील आपल्या सोबत ठेवतो. सर्व व्यक्तिरेखांच्या लुकमधले सगळे घटक सहेतुक बनवलेले आहेत. ही पात्रे जिवंत आणि दिव्य दिसावीत या विचाराने त्यांचा लुक नक्की करण्यात आलेला आहे.
वाली आणि सुग्रीवाची भूमिका करणारा माहिर पांधी म्हणतो, “वाली आणि सुग्रीव या दोन्ही भूमिका करायला मिळणे ही मला मिळालेली एक मोठी संधी आहे. त्यांच्या भिन्न लुकमुळे त्यांचे भिन्न गुणधर्म साकारण्यात मला बरीच मदत होते. मी जेव्हा लाल बुंद आणि योद्ध्याच्या आभूषणांनी नटलेला वालीचा पोशाख चढवतो, तेव्हा मला त्याची ताकद आणि तीव्रता जाणवते. दुसरीकडे, सुग्रीवची ऊर्जा सौम्य आहे. त्याचा पोशाख त्याच्या व्यक्तिमत्त्वाला एक सौहार्द देतो. एका लुकमुळे व्यक्तिरेखेला कसा आकार मिळतो हे पाहून अचंबा वाटतो. मला वाटते प्रेक्षक जेव्हा वाली आणि सुग्रीव यांना पडद्यावर बघतील, तेव्हाच त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील भिन्नता त्यांना जाणवेल.”
अंजनीची भूमिका करणारी सायली साळुंखे म्हणते, “अंजनीचा लुक खरोखर विशेष आहे. तिचे पोशाख आणि आभूषणे प्राचीन मंदिरे आणि अजिंठा-वेरूळच्या लेण्यांवरून प्रेरित आहे. तिच्या लुकमधून तिचे दिव्य व्यक्तिमत्व झळकून उठते आणि एक माता म्हणून तिची ताकद दिसते. मी जेव्हा पहिल्यांदा हा कॉस्च्युम परिधान केला, तेव्हा तत्काळ मी या व्यक्तिरेखेशी निगडीत झाले. अंजनी या अत्यंत प्रेमळ आणि शक्तिशाली स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वाशी एकरूप होण्यासाठी या लुकची मला मदत होते. अंजनी शक्तिशाली आहे पण ही ताकद प्रेमातून आली आहे आणि मला आशा आहे की, हा भाव पडद्यावर स्पष्ट होईल.”
केसरीची भूमिका करणारा आरव चौधरी म्हणतो, “केसरी एक शक्तिशाली राजा आहे, पण त्याच्या लुकमधून एक पिता आणि संरक्षक म्हणून त्याचे कर्तव्य देखील झळकते. त्याच्या मस्टर्ड-लाल रंगाच्या सिल्क पोशाखातून आणि मुकूटातून त्याच्या राज्याचा प्रांत दिसतो. मी जेव्हा पहिल्यांदा हा पोशाख चढवला, तेव्हा ही भूमिका करण्यात जी जबाबदारी आहे, त्याचे ओझे मला जाणवले. तो असा नेता आहे जो सदाचरणी आहे. माझ्या पोशाखात सामर्थ्य आणि साधेपणा यांचे मिश्रण आहे, जे मला फार आवडले आहे. जेव्हा जेव्हा मी हा पोशाख परिधान करतो तेव्हा मला केसरी हा एक अत्यंत दृढ निश्चयी आणि वत्सल पिता होता याचे स्मरण होते.”