
no images were found
तेनाली रामामध्ये तेनाली रामापुढे भयंकर आव्हान;
सोनी सबवरील ‘तेनाली रामा’ ही मालिका तेनाली रामा (कृष्ण भारद्वाज) या एका दरबारी कवी आणि अत्यंत चतुर व्यक्तिरेखेच्या सुरस कथांनी प्रेक्षकांचे खूप मनोरंजन करत आहे. अलीकडच्या भागांमध्ये, लहान मुलांच्या टोळीतील लछमा (आरिया सकरिया) ला विषारी रसायनाने माखलेला हत्ती दिसतो. या रसायनाचा पाण्याशी संपर्क आल्यावर भयंकर प्रतिक्रिया होत असल्याचे रामाला समजते. तेनाली गिरगिटच्या अशुभ भविष्यवाणीनुसार शहरात मोठी आपत्ती येण्याअगोदर या गजराजाला शहराच्या बाहेर काढण्याच्या मोहिमेवर निघतो.
आगामी भागांमध्ये या रहस्यमयी हत्तीच्या रूपाने कोणते संकट येऊ घातले आहे, हे सगळ्यांना समजावण्याचा प्रयत्न करतो. पुढे कृष्णदेवराय राजाला (आदित्य रेडिज) हे समजते की हे शत्रूने वापरलेले एक साधन आहे. ते सगळे मिळून त्या हत्तीला एका खड्ड्यात ढकलतात. रामाचे कौतुक होते आणि लोक त्याची क्षमा मागतात. पण शोकांतिका त्यानंतर चालू राहते. लछमा नकळत त्या हत्तीच्या शरीरावरील विषारी वायू आपल्या श्वासात ओढते आणि आजारी पडते. तेनालीला ती सांगते की याच रसायनामुळे तिच्या आईचा दुर्दैवी मृत्यू झालेला असतो. आता तिचे स्वतःचे जीवन अधांतरी असताना तेनाली तिचा जीव वाचवण्यासाठी रक्तपुष्प फुलाच्या शोधात निघतो. दरम्यान, गिरगिट राज (सुमित कौल) राजा कृष्णदेवरायाला युद्धासाठी डिवचतो आणि तीव्र संघर्षाची परिस्थिती निर्माण करतो.
‘तेनाली रामा’ मालिकेत तेनालीची भूमिका करणारा कृष्ण भारद्वाज म्हणतो, “तेनाली रामापुढे एक मोठे संकट उभे आहे. शहरात सोडलेला हत्ती म्हणजे शत्रूचे शस्त्र होते, हे समजल्यावर हत्तीचा निकाल केल्यामुळे संकट टळले असे त्याला वाटते. पण जेव्हा लछमाची प्रकृती ढासळते तेव्हा आणि याच विषाने तिच्या आईचा देखील जीव घेतला होता, हे सत्य त्याला समजते तेव्हा रामा हेलावून जातो. आता त्याला लछमाला तर वाचवायचेच आहे, पण तिला संजीवन देणाऱ्या एका दुर्मिळ फुलाचा शोध देखील घ्यायचा आहे. संकट मोठे आहे. आगामी भागात दिसेल की, विजयनगरची शांती भंग करण्याच्या प्रयत्नात असलेल्या गिरगिट राजचा सामना करण्यासाठी रामाला कशी तयारी करावी लागणार आहे.