
no images were found
अखिल भारतीय सावरकर सर्किट तयार करावे : राज्यपाल
मुंबई, : मुंबई विद्यापीठ हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे शिक्षणाचे स्थळ असून त्यांच्या जीवन आणि कार्याला समर्पित अभ्यास आणि संशोधन केंद्र दिशादर्शक आणि प्रेरणादायी ठरेल. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याशी संबंधित ठिकाणांना जोडणारे अखिल भारतीय सावरकर सर्किट तयार करण्याचे प्रयत्न व्हावे,असे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी सांगितले.
मुंबई विद्यापीठ येथील सर कावसजी जहाँगीर दीक्षांत सभागृह येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार, यांच्या प्रमुख उपस्थिती स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अभ्यास व संशोधन केंद्राचे (ऑनलाइन) उद्घाटन आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १४२व्या जयंतीच्या पूर्वसंध्येनिमित्त विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. यावेळी आमदार अतुल भातखळकर, पराग अळवणी, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. रविंद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरु अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांच्यासह प्राध्यापक,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर हे थोर विद्वान, कवी, इतिहासकार, पुरोगामी विचारवंत आणि अग्रणी समाजसुधारक होते. ते अस्पृश्यतेच्या सामाजिक दुष्कृत्याच्या विरोधात होते. त्यांनी अस्पृश्यतेच्या प्रथेला पाप आणि माणुसकीवरील कलंक मानले. ते रूढीवादाच्या विरोधात उभे राहिले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही जातीभेद निर्मूलनासाठी सावरकरांच्या कार्याचे आणि वचनबद्धतेचे कौतुक केले होते.
मुंबई विद्यापीठात स्थापन होत असलेले हे अभ्यास आणि संशोधन केंद्र सावरकरांचे साहित्य, विचार आणि तत्त्वज्ञान यांना प्रोत्साहन देईल तसेच त्यांचा प्रसार करेल असे राज्यपाल राधाकृष्णन यांनी सांगितले.