
no images were found
महाशिवरात्रीच्या निमित्ताने सोनी सबचे कलाकार सांगत आहेत भगवान शिवाशी असलेले आपले आध्यात्मिक नाते
या महाशिवरात्रीच्या निमित्ताने कृष्ण भारद्वाज, प्रियंवदा कांत, आरव चौधरी, माहिर पांधी आणि सायली साळुंखे हे सोनी सबचे कलाकार सांगत आहेत की त्यांच्या जीवनात या पवित्र दिवसाचे काय महत्त्व आहे. या अभिनेत्यांसाठी महाशिवरात्री हा केवळ एक सण नाही, तर ते भक्ती आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचे पर्व आहे. उपवास आणि पारंपरिक पूजा-अर्चा करण्यापासून ते भगवान शिवाच्या दिव्यत्वातून प्रेरणा घेईपर्यंत या दिवसाचे प्रत्येकासाठी काही तरी आगळे महत्त्व आहे. या प्रत्येकाचा हा देखील अनुभव आहे की, शिवरात्रीच्या व्रतामुळे त्यांची श्रद्धा कशी अधिक दृढ होते आणि त्यांना मानसिक शांती आणि सद्भावनेचा अनुभव होतो.
‘तेनाली रामा’ मालिकेत तेनालीची भूमिका करणारा कृष्ण भारद्वाज म्हणतो, “महाशिवरात्री हा परिवारासोबत साजरा करण्यात येणारा एक मोठा सण आहे. मी अगदी लहान असल्यापासून शिवरात्रीच्या दिवशी उपवास करत आहे. ही शिवरात्री माझ्यासाठी विशेष आहे, कारण त्यावेळी माझे आई-वडील देखील माझ्यासोबत मुंबईत आहेत. त्या दिवशी माझी आई मारवाडी पद्धतीचे फराळी पदार्थ करणार आहे, ज्याचा आस्वाद घेण्यासाठी मी आसुसलो आहे.”
‘तेनाली रामा’ मालिकेत शारदा ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री प्रियंवदा कांत म्हणते, “मी शिवभक्त असल्यामुळे शंकराची दिव्य ऊर्जा आणि प्रतिकात्मकता यातून मला प्रेरणा मिळते. शंकराचा तिसरा नेत्र आपल्याला जे भौतिक नजरेला दिसते त्याच्या पलीकडे बघण्याचे स्मरण देतो आणि आपल्या अंतःप्रेरणेवर विश्वास ठेवण्याची प्रेरणा देतो. त्याचा त्रिशूळ आपल्या अहंकार, मन आणि बुद्धी यांचा समतोल साधायला शिकवतो. शिवाच्या आशीर्वादाने आपणा सर्वांना शांती, सलोखा आणि स्वत्वाची जाणीव यांचा लाभ होऊ दे. माझ्यातर्फे सगळ्यांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा!”
‘वीर हनुमान’ मालिकेत केसरीची भूमिका करणारा आरव चौधरी म्हणतो, “मी तसा आध्यात्मिक वृत्तीचा आहे. त्यामुळे महाशिवरात्रीचे माझ्या मनात विशेष स्थान आहे. दर वर्षी, मी भक्तिभावाने शंकराची पूजा करतो. त्यात शिवलिंगावर दूध आणि पाण्याचा अभिषेक करून बेलपत्र, धतुरा, चंदन वाहतो आणि फळे अर्पण करतो. पूजा करताना केलेल्या मंत्रोच्चारामुळे आणि दिवे तेवत असल्याने एक शांत आणि दिव्य वातावरण उभे राहते. माझ्यासाठी हे विधी करणे हा केवळ परंपरेचा भाग नसून ते माझ्या मनःशांतीसाठी आणि ईश्वराच्या ठायी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आहे.”
‘वीर हनुमान’ मालिकेत वाली आणि सुग्रीवची दुहेरी भूमिका करत असलेला माहिर पांधी म्हणतो, “महाशिवरात्रीची जी नीलकंठ कथा आहे, ती फारच अचंबित करणारी आहे. समस्त विश्वाचे रक्षण करण्यासाठी भगवान शिवाने समुद्रमंथनातून निघालेले हलाहल कसे स्वतः प्राशन केले या गोष्टी माझे वडील सांगत असत. या सणाच्या दिवशी मला हटकून ते बालपणीचे दिवस आठवतात. मी सर्वांना शिवरात्रीच्या शुभेच्छा देतो- जय महाकाल!”
‘वीर हनुमान’ मालिकेत अंजनीची भूमिका करत असलेली अभिनेत्री सायली साळुंखे म्हणते, “महाशिवरात्री ही ध्यानासाठी अत्यंत पवित्र मानले जाणारे पर्व आहे. मी या दिवशी न चुकता उपवास करते. असे म्हणतात की, या दिवशी मनोभावे शिव पूजा केल्यास भक्त जन्म-मरणाच्या चक्रातून मुक्त होतो आणि त्याला मोक्ष मिळतो. या पवित्र दिनी भगवान शंकराचा आशीर्वाद आपणा सर्वांना लाभो!”