
no images were found
अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने महाराष्ट्रातील सागरी संसाधनांचे संरक्षण
मुंबई : जागतिक दर्जाचे ड्रोन तंत्रज्ञान पुरवणारी कंपनी आयडियाफॉर्ज टेक्नॉलॉजी लिमिटेडने श्नेल ड्रोन टेक्नॉलॉजीज लिमिटेडसोबत महाराष्ट्र शासनाच्या मत्स्यव्यवस्थापन विभागातर्फे सुरू करण्यात आलेल्या ऐतिहासिक प्रकल्पासाठी हातमिळवणी केली आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ९ जानेवारी रोजी मुंबई येथे अधिकृतरीत्या सुरू करण्यात आला. या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत मत्स्य आयुक्त कार्यालयात उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश राज्याच्या सागरी हद्दीत मासेमारीला आळा घालणे हा आहे. या कार्यक्रमाला श्नेल ड्रोन टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक भूषण खोमणे आणि आयडियाफॉर्ज टेक्नॉलॉजी लिमिटेडचे व्यवसाय विकास विभागाचे उपाध्यक्ष विशाल सक्सेना यांचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाद्वारे अत्याधुनिक ड्रोन आधारित देखरेख आणि डिजिटल डेटा व्यवस्थापन प्रणालीची सुरुवात झाली. महाराष्ट्र मरीन फिशिंग रेग्युलेशन (सुधारणा) अधिनियम, २०२१ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ही प्रणाली तयार करण्यात आली आहे. भारतात प्रथमच अशा प्रकारचे ड्रोन तंत्रज्ञान मत्स्यव्यवस्थापनासाठी वापरले जात आहे, ज्यामुळे सागरी संसाधन व्यवस्थापन आणि नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी नवे मापदंड निर्माण झाले आहेत.
महाराष्ट्राच्या ७२० किमी लांब समुद्रकिनाऱ्यावर पसरलेल्या या प्रकल्पाअंतर्गत सात प्रमुख किनारी जिल्ह्यांमध्ये ड्रोन तैनात करण्यात आले आहेत, ज्यामध्ये पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांचा समावेश आहे. या भागीदारीअंतर्गत आयडियाफॉर्जचे स्विच यूएव्ही ड्रोन तैनात केले जात असून, त्याद्वारे सागरी नियमांचे पालन, सागरी परिसंस्थांचे रक्षण आणि मासेमारी नौकांची वास्तविक वेळेतील देखरेख व बेकायदेशीर कृत्यांचे निरीक्षण केले जात आहे. प्रकल्पाची कालावधी प्रारंभिक आठ वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
श्नेल ड्रोन टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक भूषण खोमणे यांनी या भागीदारीबद्दल मत व्यक्त करताना सांगितले की, भारतामध्ये राज्याच्या सागरी हद्दीत श्नेल ड्रोन टेक्नॉलॉजीज लिमिटेडतर्फे अशा प्रकारचा प्रकल्प प्रथमच राबवला जात आहे. आयडियाफॉर्जच्या उत्पादनांचे अद्वितीय वैशिष्ट्य या प्रकल्पात मोठा बदल घडवत आहे. ड्रोनच्या थेट फीडचे प्रक्षेपण तटरक्षक दल, किनारी पोलीस व भारतीय नौदल अशा अनेक सरकारी एजन्सीजसह सामायिक केले जात आहे. यामुळे या प्रदेशाच्या किनारी सुरक्षेला नवा आयाम मिळाला आहे.
हा उपक्रम भारत सरकारच्या टिकाऊ मत्स्यव्यवस्थापनाच्या व्यापक दृष्टीकोनाशी सुसंगत आहे. ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर मत्स्यपालन शेतांचे व्यवस्थापन, मत्स्य प्रकल्पांचे मूल्यमापन, तसेच आपत्ती प्रतिसाद सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे. हे प्रयत्न केंद्र सरकारच्या १० हवामान प्रतिरोधक किनारी मासेमार खेडी उभारण्याच्या मिशनशी सुसंगत आहेत, जे टिकाऊ समुदाय निर्मितीमध्ये तंत्रज्ञानाच्या महत्त्वावर प्रकाश टाकतात.
या प्रकल्पाद्वारे महाराष्ट्र मरीन फिशिंग रेग्युलेशन (सुधारणा) अधिनियम, २०२१ च्या अंमलबजावणीला गती मिळेल. पारंपरिक मच्छिमार समुदायाचे हित जपण्यासोबतच स्थलांतरित मच्छिमारांकडून होणाऱ्या बेकायदेशीर मासेमारीला आळा घालता येईल,” असे मत्स्यमंत्री नितेश राणे यांनी सांगितले. “नौका गस्तीद्वारे करण्यात येणाऱ्या तपासण्या अनेकदा आव्हानात्मक ठरतात, कारण अनधिकृत बोटींना पकडणे कठीण होते. ड्रोनच्या मदतीने जलद आणि अधिक प्रभावी गस्त घालता येईल, वास्तव समयातील पुरावे गोळा करता येतील, तसेच एकाच वेळी अनेक भागांवर लक्ष ठेवता येईल. यामुळे अनधिकृत मासेमारी ओळखणे अधिक सोपे होईल आणि सागरी कायद्यांतर्गत कठोर कारवाई करणे शक्य होईल. तटरक्षक पोलीस विभागाशी समन्वय साधून ड्रोनच्या मदतीने किनारी क्षेत्रांवर देखरेख अधिक मजबूत होईल.”
आयडियाफॉर्ज टेक्नॉलॉजी लिमिटेडचे व्यवसाय विकास विभागाचे उपाध्यक्ष विशाल सक्सेना म्हणाले, या ऐतिहासिक प्रकल्पाचा भाग होण्याचा आम्हाला अभिमान आहे, जो भारतीय तंत्रज्ञानाने मत्स्यव्यवस्थापनाच्या प्रमुख समस्या सोडवण्यासाठी कसा उपयोग होऊ शकतो हे अधोरेखित करतो. या भागीदारीतून नाविन्यपूर्ण दृष्टिकोनामुळे टिकाऊ प्रथा राबवण्यास मदत होईल, तसेच सागरी संसाधनांचे संरक्षण सुनिश्चित करता येईल. आगामी काळात मत्स्य विभाग किनारपट्टी मॅपिंगवर लक्ष केंद्रित करेल, तेव्हा आमचे प्रगत यूएव्ही ड्रोन निरीक्षण क्षमतांमध्ये वाढ करतील आणि या पुढारलेल्या दृष्टीकोनाला पूरक ठरतील.”
ही भागीदारी भारताच्या ड्रोन क्षेत्रातील नेतृत्व आणि विविध उद्योगांमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याच्या वचनबद्धतेची पुष्टी करते.