
no images were found
अबब ! ३० कोटींची रक्कम चोरली, चौघांना अटक
कल्याण: डोंबिवलीमधील एमआयडीसी भागात असलेल्या आयसीआयसीआय या बँकेच्या तिजोरीतून जुलै महिन्यात ३४ कोटी रुपये चोरण्यात आले होते. या प्रकरणी तिघांना अटक केल्यानंतर आता या टोळीचा मुख्य सूत्रधार बँक कर्मचारी अल्ताफ शेखसह त्याची बहीण निलोफर हिला जेरबंद करण्यात आले. आतापर्यंत पोलिसांनी आरोपींकडून ३० कोटी जप्त केले आहेत.
तपासादरम्यान बँकेत काम करणारा कॅश मॅनेजर अल्ताफ शेख याने साथीदारांसह ही रक्कम चोरल्याचे समोर आले. पोलिस या टोळीच्या मागावर होते. या प्रकरणात इसरार कुरेशी, अहमद खान आणि अनुज गिरी या तिघांना ऑगस्टमध्ये अटक करण्यात आली होती, मात्र अल्ताफ पोलिसांच्या हाती सापडत नव्हता. अटक आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार, एक वेब सीरिज पाहून अल्ताफला चोरीची कल्पना सुचली. त्याने झटपट श्रीमंत होण्याचा नादात बँकेत चोरीचा कट केला. त्यासाठी तीन साथीदारांची मदत घेतली. बँकेतील एसीच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याची संधी साधत चोरीसाठी लागणारे साहित्य जमा केले. ९ जुलैला सुट्टीच्या दिवशी बँकेचे अलार्म निष्क्रिय केले. सर्व कॅमेऱ्यांच्या हार्ड डिस्क काढून घेतल्या. त्यानंतर तिजोरीतून ३४ कोटी रुपये लंपास केले.
हे पैसे त्याने एसीच्या डक्टमधील छिद्रातून बँकेच्या इमारतीच्या मागील बाजूस बांधलेल्या ताडपत्रीवर फेकून दिले. बँकेतील सीसीटीव्हीचा डीव्हीआर गहाळ असल्याची माहिती बँकेच्या वरिष्ठांना देऊन तिजोरीतील रक्कम तपासणी करण्याचे पथक बोलावले. एकीकडे तपासणी सुरू असताना दुसरीकडे त्याने कुरेशी, अहमद खान आणि अनुज गिरी या तीन मित्रांना बोलवून सुमारे १२ कोटी रुपये त्यांच्याकडे सोपवले. उरलेले २२ कोटी त्याला घेता आले नाहीत. ते त्याने तिथेच ठेवले. दोन महिन्यांपूर्वी पोलिसांनी तीन आरोपींकडून पाच कोटी ८० लाखांची रोकड जप्त केली. मात्र उर्वरित रक्कम घेऊन अल्ताफ पसार झाला होता. अखेर पोलिसांनी अल्ताफसह त्याची बहीण निलोफर या दोघांना बेड्या ठोकल्या. चोरीचे पैसे लपविण्यासाठी त्याने नवी मुंबईतील उच्चभ्रू परिसरात घर भाड्याने घेतले होते.
अल्ताफने काही रक्कम नवी मुंबई परिसरात एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या जिन्याखाली लपवून ठेवली होती. मात्र पोलिस मागावर असल्याने त्याला त्या इमारतीजवळ पुन्हा येता आले नाही. हे पैसे इमारतीमध्ये नशा करण्यासाठी आलेल्या मुलांच्या हाती लागले. त्यांनी ते नशा, मौजमजा करण्यासाठी खर्च केल्याची माहितीही समोर आली आहे. या अल्पवयीन मुलांची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.