no images were found
निर्वाण कल्याणक महोत्सवादरम्यान आयोजित स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा – अमोल येडगे
कोल्हापूर : 24 वे जैन तिर्थंकर भगवान महावीर स्वामी यांच्या 2550 व्या निर्वाण कल्याणक महोत्सवाकरीता राज्य शासनामार्फत राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून त्यांनी दिलेला संदेश आणि विचार याची शालेय विद्यार्थ्यांना ओळख व्हावी, याकरिता शिक्षण विभागाने दिनांक 25 ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीत जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत निबंध स्पर्धचे आयोजन करावे, या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात भगवान महावीर यांच्या 2550 व्या निर्वाण वर्षानिमित्त जिल्हास्तरीय समितीची बैठक संपन्न झाली यावेळी ते बोलत होते. या बैठकीस राज्य समिती सदस्य ललित गांधी, समितीतील सदस्य जसवंत भाई रसिकलाल शाह, नरेंद्र ओसवाल, कांतीलाल संघवी, राजेंद्र ओसवाल, ऋषभ छाजेड, सुरेश रोटे, अमित वोरा, महावीर तकडे, मेघ गांधी, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) अजय पाटील, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) शंकर यादव तसेच प्रत्येक तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. अमोल येडगे म्हणाले, 24 वे जैन तिर्थंकर भगवान महावीर स्वामी यांच्या 2550 व्या निर्माण कल्याणक महोत्सवानिमित्त भगवान महावीर स्वामी यांच्या जीवन कार्याची ओळख या विषयावर इयत्ता 5 ते 7 वी व इयत्ता 8 ते इयत्ता 10 वी अशा दोन गटात जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. या निबंध स्पर्धेतून शाळास्तरावरुन दोन्ही गटातील प्रत्येकी 3 क्रमांकाची तालुका स्तरावरासाठी निवड तर तालुकास्तरावरुन दोन्ही गटातील प्रत्येकी 5 क्रमांकाची जिल्हास्तरासाठी निवड करण्यात येणार असून जिल्हास्तरावरुन दोन्ही गटातील प्रत्येकी 5 क्रमांकाची निवड करुन राज्य स्तरावर पाठविण्यात येणार आहे. या निबंध स्पर्धेतील विजेत्यांना रोख बक्षिस आणि प्रमाणपत्रे देवून गौरविण्यात येणार आहे. या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम 3 क्रमाकांमध्ये जिल्ह्यातील एक विद्यार्थी निवडला जाईल, असा उद्देश ठेवून या स्पर्धेची तयारी करा, अशा सूचना शिक्षण विभागाला देवून या निबंध स्पर्धेविषयी जिल्ह्यातील सर्व शाळांना निबंध स्पर्धेचे निकष, निबंध स्पर्धेचे वेळापत्रक, इ. माहिती शिक्षण विभागांनी प्रत्येक शाळेला द्यावी.
प्रास्ताविकात राज्य समिती सदस्य ललित गांधी यांनी या निबंध स्पर्धेविषयी उपस्थितीतांना माहिती दिली. यावेळी शिक्षण विभागाचे अधिकारी-कर्मचारी व समितीतील अशासकीय सदस्य उपस्थित होते.