
no images were found
राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे अमित शहांना भेटल्याने राजकीय चर्चांना उधाण
पुणे : शिरुर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नुकतीच भेट घेतली. खा. डॉ. कोल्हे यांचा ‘शिवप्रताप गरुडझेप’ हा चित्रपट येत्या ५ ऑक्टोबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर डॉ. कोल्हे यांनी केंद्रीय गृहमंत्री शहा यांची दिल्लीत भेट घेतली. पण या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या आग्र्याहून सुटकेचा थरार या ‘शिवप्रताप गरुडझेप’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत खासदार, अभिनेते डॉ. अमोल कोल्हे पहायला मिळतील. थेट आग्र्यात या चित्रपटाची शुटिंग झाली असल्यामुळे अनेक प्रेक्षकांना आणि शिवप्रेमींना या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. दरम्यान डॉ. अमोल कोल्हे आणि शहा यांची भेट तितकीच महत्त्वाची मानली जात आहे.
संसदेत सरकारच्या विरोधी स्पष्ट भूमिका मांडणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यपद्धतीवर सभागृहात टीकास्त्र सोडणारे राष्ट्रवादीचे खासदार म्हणून डॉ. कोल्हे यांची ओळख आहे. मात्र, या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एकीकडे शिरुर लोकसभा मतदारसंघ जिंकायचा म्हणून भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय मंत्री रेणुका सिंग शिरुर लोकसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसांत तळ ठोकून होत्या. तर दुसरीकडे खासदार डॉ. कोल्हे यांनी अमित शहा यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.