
no images were found
‘वंशज’ मालिकेत आपल्याला तुरुंगातच मारून टाकण्याचा डीजेच्या कारस्थानाचा सामना करत आहे युविका
सोनी सबवरील ‘वंशज’ मालिकेने पुरुषांना प्राधान्य देणाऱ्या वारशाच्या परंपरेतील गुंतागुंत एका आकर्षक कथेमधून दाखवून प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. यातून महाजन कुटुंबात एक संघर्ष पेटतो आणि युविका (अंजली तत्रारी) आणि डीजे (माहिर पांधी) यांच्यात तीव्र चढाओढ सुरू होते. अलीकडच्या भागांमध्ये, डीजे युविकाचा भाऊ अर्जुन (बुनीत कपूर) याला ब्लॅकमेल करतो आणि सध्या तुरुंगात असलेल्या युविकाला मारून टाकण्यासाठी त्याच्यावर दबाव आणतो.आगामी भागांमध्ये, युविकाचा सामना तिला मारण्यासाठी आलेल्या तिच्या भावाशी, अर्जुनशी होतो. त्यात तुरुंगाची जेलर गुलरेज अप्पा (मीनल कपूर) देखील युविकाला मारण्याच्या डीजेच्या करस्थानात सामील आहे. परंतु, या धोक्याची जाणीव असलेल्या युविकाने लाल तिखटाची पूड आणि यासारख्या स्वसंरक्षणाच्या साधनांनी स्वतःला सज्ज ठेवले आहे आणि गुलरेज अप्पाच्या गँगचा ती ज्या प्रकारे सामना करते, ते पाहून सर्वजण अवाक होतात. गुलरेज युविकाला पळून जाण्याची एक संधी देते, पण युविका ती संधी नाकारते आणि तुरुंगात राहूनच आपल्या शत्रूला चित करण्याचे ठरवते.
युविका डीजेच्या कारस्थानाला जशास तसे उत्तर देण्यासाठी काय करणार?
‘वंशज’ मालिकेत युविकाची भूमिका करणारी अंजली तत्रारी म्हणते, “युविकाला याची पूर्ण जाणीव आहे की, तिला मारण्यासाठी कुणी तरी नक्की येणार आहे आणि तिने जर त्याचा सामना केला नाही, तर तिचा शेवट अटळ आहे. परिस्थिती अत्यंत बिकट असून देखील, तिचा निर्धार अढळ आहे. आगामी भागांमध्ये प्रेक्षक बघतील की, डीजेवर कुरघोडी करण्यासाठी आणि त्याच्या भयंकर योजनांना सडेतोड उत्तर देण्यासाठी युविकाची काय योजना आहे. तिचा युक्तीबाजपणा आणि हिंमत यामुळे बाजी पलटून जाईल आणि हे सिद्ध होईल की, ती केवळ स्वतःचा बचावच करू शकत नाही, तर इतरांसाठी भय देखील उत्पन्न करू शकते.”