
no images were found
”मी माझ्या दैनंदिन जीवनात फोनचा कमी वापर करण्याचा प्रयत्न करते” – शुभांगी अत्रे
एण्ड टीव्हीवरील मालिका ‘भाबीजी घर पर है’मध्ये अंगूरी भाबीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री शुभांगी अत्रे म्हणतात की, आजकाल मोकळा वेळ मिळणे अत्यंत अवघड झाले आहे. त्या म्हणतात की कामाचे वेळापत्रक अत्यंत व्यस्त आहे, ज्यामुळे स्वत:कडे लक्ष द्यायला देखील वेळ मिळत नाही आहे. शुभांगी अत्रे ऊर्फ अंगूरी भाबी म्हणाल्या, ”माझ्या मते, आपल्याला क्वचितच लांब समर ब्रेक्ससाठी वेळ मिळतो किंवा लहान ब्रेक्स मिळणे देखील अवघड जाते. जीवन इतके धावपळीचे होऊन गेले आहे की आपल्याला स्वत:कडे लक्ष द्यायला क्वचितच वेळ मिळतो. आपण कामामध्ये इतके गुंतून गेलो आहोत की इच्छा असताना देखील ब्रेक मिळणे अवघड जाते. लांब समर ब्रेक्सचा विचार केला की मला माझ्या बालपणाची आठवण येते. लहान असताना मी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये दोन महिने माझ्या आजीच्या गावी जायचे. आम्ही खूप धमाल करायचो आणि माझी आजी आमच्यासाठी स्वादिष्ट जेवण बनवायची. गावावरून घरी परतताना मन भरून यायचे आणि परत घरी जाऊ नये असे वाटायचे. मी माझ्या आजीच्या घराला पुन्हा भेट देण्यासाठी पुढील उन्हाळी सुट्टीची वाट पाहायचे.” अभिनेत्री पुढे म्हणाल्या, ”विवाह असो, प्रसूती असो किंवा आजारी असो आपल्यापैकी अनेकजण मोठी रजा घेण्यास संकोच करतात. फक्त कलाकार नाही तर सर्व व्यवसायांमधील कर्मचाऱ्यांवर हा दबाव असतो. मी पाहिले आहे की गरोदर महिला देखील आठव्या महिन्यापर्यंत काम करतात. व्यक्तिश: माझे मत आहे की, व्यक्तींनी विशेषत: आव्हानात्मक काळामध्ये स्वत:साठी वेळ दिला पाहिजे. जीवन आपल्या गतीने पुढे जात असले तरी या धावपळीच्या युगामध्ये तणाव-मुक्त राहण्यासाठी स्वत:साठी वेळ काढणे अत्यंत महत्त्वाचे आहे.”
त्या म्हणतात की, स्वत:ला उत्साहित करण्यासाठी कामामधून काहीसा ब्रेक घेतला पाहिजे. त्या म्हणाल्या, ”मी दैनंदिन तणाव व समस्या दूर करत स्वत:ला उत्साहित ठेवण्यासाठी किमान २ ते ३ दिवस कामामधून ब्रेक घेते. या ब्रेकमुळे मी पूर्णत: तणाव-मुक्त होत नसले तरी काही दिवसांकरिता समाधान मिळते. मला दिवसातून १० ते १५ तास काम करावे लागते, कधी-कधी नॉन-स्टॉप काम करावे लागते, ज्यामुळे कामामधून ब्रेक्स घेणे अधिक महत्त्वाचे आहे. म्हणून व्यवसाय कोणताही असो मी कामातून मोकळा वेळ काढण्याला महत्त्व देते. आणि या ब्रेक्सदरम्यान तंत्रज्ञानापासून दूर राहण्याचा प्रयत्न करते.” त्या पुढे म्हणाल्या, ”आमच्या व्यवसायामध्ये कधीही बोलावणे येऊ शकते, ज्यामुळे ब्रेक्सदरम्यान देखील आम्हाला फोनच्या माध्यमातून उपलब्ध राहावे लागते. पण, मी मान्य करते की या ब्रेक्सदरम्यान स्मार्टफोनपासून देखील ब्रेक घेतला पाहिजे. खरेतर, आपण आपल्या स्मार्टफोन्समध्ये खूपच गुंतून गेलो आहोत, असे मला वाटते, ज्यामुळे मी माझ्या दैनंदिन जीवनात फोनचा कमी वापर करण्याचा प्रयत्न करते. इतर गोष्टींप्रमाणे स्मार्टफोन्सचे देखील चांगले व वाईट परिणाम आहेत. आपल्याला स्मार्टफोन्सच्या माध्यमातून चांगला कन्टेन्ट पाहायला मिळतो, पण सोबत त्याचे दुष्परिणाम देखील आहेत. म्हणून समाधानासाठी आणि सकारात्मक दृष्टिकोन राखण्यासाठी स्मार्टफोनचा कमी वापर करणे महत्त्वाचे आहे.”