
no images were found
तेनाली रामा’ मालिकेत दिसणार कुणाल करण कपूर
सोनी सबवरील तेनाली रामा मालिकेत कृष्ण भारद्वाजने साकारलेल्या तेनाली या दरबारी कवी आणि मुत्सद्दी रणनीतीकर्त्याच्या सुरस रम्य कथा पाहताना प्रेक्षक गुंग झाले आहेत. विनोद, बुद्धीचातुर्य आणि सुजाणता यांचे मिश्रण करून सादर करणारी ही मालिका आता एक नवीन वेधक वळण घेत आहे. अभिनेता कुणाल करण कपूर लक्ष्मणप्पा भट्टारू म्हणजे लक्ष्मणच्या रूपात मालिकेत दाखल होत आहे. माजी लष्करी डॉक्टर आणि आता गुप्तहेर झालेल्या लक्ष्मणच्या एंट्रीमुळे मालिकेत वेगवेगळे तरंग उठताना दिसतील.
लक्ष्मण इमानदार, विवेकी आणि अत्यंत बुद्धिमान आहे. सगळ्या गोष्टी तो विज्ञानाच्या कसोटीवर तपासून घेतो ज्ञान, सत्य आणि न्यायाचा शोध घेण्यासाठी त्यांचे हिंसेचे जीवन मागे टाकले आहे. रामाच्या जगात त्याचा प्रवेश एका आगळ्यावेगळ्या तळपत्या भागीदारीची सुरुवात दर्शवितो. ही अशी भागीदारी आहे, ज्यात बुद्धी आणि शारीरिक सामर्थ्य दोन्हीची आवश्यकता आहे. तेनाली रामा जर राज्यातील सर्वात चाणाक्ष माणूस असेल तर लक्ष्मण तर्कनिष्ठ आहे. रामाचा तेजस्वीपणा तो शांत व्यावहारिकतेने सौम्य करतो आणि कित्येकदा अटीतटीच्या परिस्थितीत अनपेक्षितपणे नायक बनून जातो. लक्ष्मणकडे जीवशास्त्रीय विचार आहे, वैद्यकीय नैपुण्य आहे तसेच तलवार चलवण्याचे कसब आणि व्यावहारिक युक्त्या देखील आहेत. तो एक परिपूर्ण पॅकेज आहे. रामाशी त्याचे नाते घनिष्ठ आहे, कधी कधी ते विचारसरणीच्या संघर्षात परिणत होते. अशाप्रकारे लक्ष्मणच्या एंट्रीमुळे मालिकेला नवीन गहनता आणि नाट्यमयता मिळाली आहे.
तेनाली रामा मालिकेत लक्ष्मणप्पा भट्टारूची भूमिका करणारा कुणाल करण कपूर म्हणतो, “लक्ष्मण ही व्यक्तिरेखा मी या आधी साकारलेल्या भूमिकांपेक्षा खूप वेगळी आहे. त्याच्यात विविध स्तर आहेत, एक शक्तिशाली भूमिका आहे. तेनाली रामा मालिकेत दाखल होताना मी एक निवृत्त लष्करी डॉक्टर आहे, जो शांतीच्या शोधात निघाला आहे. पण अचानक तो एका थरारक साहसात ओढला जातो आणि एका लक्षवेधी अध्यायाची सुरुवात होते. सोनी सबशी माझे नाते दोन दशकांपासून आहे. प्रत्येक वेळी इथे परतताना असे वाटते की जणू अर्धे वाचून ठेवलेले पुस्तक पुन्हा हाती घेतले आहे. आणि या पुस्तकात अजून काही रोचक प्रकरणे वाचायची बाकी आहेत. व्यक्तिशः माझ्या प्रवासात, मी पहिल्यांदाच ऐतिहासिक मालिका आणि कॉस्च्युम शो करत आहे. इतका वेगळा पोशाख करणे हे आव्हानात्मक होऊ शकते. पण इकडच्या टीमने लुकबाबत उत्तम कामगिरी केली आहे. ही भूमिका मी स्वीकारली याचा मला आनंद वाटतो. मला सेटवरचा माझा पहिला दिवस आठवतो. मी आरशासमोर उभा होतो, पोशाखानुसार स्वतःला जुळवून घेण्याचा प्रयत्न करत होतो. आणि आपल्याला हे जमेल ना अशी शंका देखील मनात डोकावत होती. पण हळूहळू मी त्या व्यक्तिरेखेत शिरलो. आणि आता या पोषाखाशिवाय लक्ष्मणचा विचार करणे देखील अवघड आहे.”