no images were found
नंदुरबारमधील विवाहितेचा दुसरा शवविच्छेदन अहवाल समोर, डॉक्टरांकडून संशय व्यक्त
मुंबई : नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात बलात्कार करून हत्या केल्याचा संशय असलेल्या २१ वर्षीय महिलेवर शुक्रवारी पहाटे जेजे रुग्णालयात दुसरे शवविच्छेदन करण्यात आले. नंदुरबारमधील एका व्यक्तीने तिच्या २१ वर्षीय मुलीचा मृतदेह मिठाच्या खड्ड्यात ४४ दिवस पुरुन ठेवला होता. त्यांचा असा संशय होता की त्यांच्या मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. जेजेच्या फॉरेन्सिक तज्ञांनी पुष्टी केली की महिलेचा मृत्यू रहस्यमय परिस्थितीत झाला आहे आणि तिच्या मृत्यूच्या घटनांबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत.
नंदुरबारच्या या महिलेचा मृतदेह गुरुवारी भायखळा येथील जे.जे. रुग्णालयात आणण्यात आला आणि शुक्रवारी पहाटे २.३० वाजता तिच्यावर पुन्हा एकदा शवविच्छेदन करण्यात आले, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. टाइम्सला मिळालेल्या माहितीनुसार, महिलेच्या मानेवर बांधून ठेवल्याच्या खुणा आढळल्या आहे. महिलेचा उजवा हात अकार्यक्षम, तर डावा हात व्यवस्थित होता, त्यामुळे ती स्वत:ला कसे लटकवेल, हे देखील तज्ज्ञांना गोंधळात टाकणारे आहे. खरं तर, नंदुरबारमध्ये करण्यात आलेल्या पहिल्या शवविच्छेद अहवालात हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे म्हटले होते आणि कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार नाकारण्यात आला होता. मात्र, जेजेच्या डॉक्टरांनी दिलेली माहिती संशय व्यक्त करणारी आहे. “एक हात असलेली व्यक्ती दोरी बांधून स्वत:चा जीव घेऊ शकत नाही हे सहज सांगता येईल. हा मृत्यू संशयास्पद आहे, यात काहीही शंका नाही,” असं सूत्राने सांगितले.
दुर्दैवाने, याही शवविच्छेदन अहवालात लैंगिक अत्याचाराच्या आरोपावर जास्त काही माहिती देण्यात आलेली नाही. कारण, मिठाच्या खड्ड्यात असूनही मृतदेह अर्धवट कुजलेला होता, असे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले. “मृतदेह प्लास्टिकच्या शीटमध्ये गुंडाळून मिठाच्या खड्ड्यात ठेवण्यात आला होता. त्यामुळे मृतदेहाचं विघटन पूर्णपणे थांबवलं जाऊ शकत नाही,” असंही सूत्रांनी सांगितलं. “यामुळे तिच्यावर लैंगिक अत्याचार झाले की नाही हे अद्याप अनिश्चित राहिले आहे,” असंही त्यांनी सांगितलं.