
no images were found
अशोकराव चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि काँग्रेसचे प्रमुख नेत्यापैकी एक असलेले अशोकराव चव्हाण यांनी अखेर मुंबईतील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात भाजपमध्ये प्रवेश केला. कोणतीही अपेक्षा न करता पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यावर विश्वास ठेवून आपण भाजपमध्ये प्रवेश करीत असल्याचे अशोकराव चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तर उपमुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यातील नेते देवेंद्र फडणवीस यांनी अशोकराव चव्हाण यांचा पक्षात योग्य वेळी योग्य सन्मान होईल असे स्पष्ट केले.
राज्यात भाजपने शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसला धक्के देत गेलेली सत्ता हस्तगत केल्यानंतर आता काँग्रेसला मोठा धक्का दिला. काँग्रेसचे पक्षात मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि सध्या प्रमुख नेत्यांपैकी एक अशी भूमिका बजावलेले अशोकराव चव्हाण यांनाच भाजपमध्ये खेचून आणले. अशोकराव चव्हाण यांनी प्रथम काँग्रेस पक्षाचा आणि त्यानंतर आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर आज त्यांनी मुंबईतील भाजप कार्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थित भाजपमध्ये प्रवेश केला.
‘पुन्हा एकदा राजकीय आयुष्याची नवी सुरुवात करीत असल्याचे सांगत’ अशोकराव चव्हाण यांनी मी भाजपकडे काही मागितलेले नसल्याचे स्पष्ट केले. आदर्श घोटाळा प्रकरणी दबाव असल्याचा इन्कार करताना त्यांनी याबाबत हायकोर्टाचा निर्णय आमच्या बाजूने लागला असल्याचे सांगितले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र यावेळी थेट काँग्रेसला लक्ष करताना काँग्रेसला आपले नेते सांभाळता आले नाही. त्यामुळे आणखीही काही आमदार आणि नेते आमच्याबरोबर येणार असल्याचे सांगून काँग्रेसने आत्मचिंतन करण्याची गरज असल्याची टिप्पणीही केली. मराठवाड्यात आता भाजपची ताकद वाढेल अशोकराव चव्हाण यांच्या प्रशासकीय अनुभवाचा भाजपला फायदा होईल असेही फडणवीस यांनी सांगितले